पुणे: काही दिवसांपूर्वी माधवी खंडाळकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या नेत्या रुपाली ठोंबरे पाटील यांच्यावर मारहाणीचा आरोप केला होता. असा आरोप करणाऱ्या माधवी खंडाळकरांवर रुपाली ठोंबरे पाटील यांनी 10 कोटी रुपयांच्या अब्रुनुकसानीचा दावा ठोकला आहे. त्याबाबतची कायदेशीर नोटीसही पाठवली आहे. काही दिवसांपूर्वी माधवी खंडाळकर यांनी सोशल मीडियावर रुपाली पाटील यांच्याविरोधात पोस्ट केली होती. विरोधात बोलल्याच्या रागातून रुपाली पाटील यांनी आपल्याला गुंड पाठवून अमानुष मारहाण केल्याचा आरोप त्यांनी केला होता. त्याबाबतचा व्हिडीओ त्यांनी सोशल मिडीयावर केला होता. त्यानंतर हा व्हिडीओ बराच व्हायरल झाला होता. त्या व्हडीओत त्या रक्तबंबाळ अवस्थेत दिसत होत्या.
आरोपांचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर काही तासांतच माधवी खंडाळकर यांनी यू-टर्न घेतला. त्यांनी दुसरा व्हिडीओ टाकत “चुकीने व्हिडीओ पोस्ट झाला, आम्ही जुन्या ओळखीच्या आहोत, गैरसमजातून वाद झाला, तो कुटुंबीयांमध्ये मिटवत आहोत, यावर राजकारण करू नये” असे स्पष्टीकरण दिले. मात्र नंतर त्यांनी पुन्हा दावा केला की, माफीचा व्हिडीओ रुपाली पाटील यांनी बळजबरीने करून घेतला.
रुपाली ठोंबरे पाटील यांनी हे आरोप फेटाळले आहेत. मारहाणीचा आरोप केला त्या दिवशी त्या बीड येथे होत्या, त्यामुळे असा प्रकार घडणे शक्यच नव्हते, असे त्यांनी स्पष्ट केले. आपली प्रतिमा मलीन करण्याचा हा कट असल्याचा दावा करत त्यांनी माधवी खंडाळकर यांना वकिलांमार्फत 10 कोटींच्या मानहानीची नोटीस पाठवली आहे. या प्रकरणामुळे दोन्ही नेत्यांमधील वाद उघड झाला असून, तो आता कायदेशीर लढाईत रूपांतरित होण्याची चिन्हे आहेत. रुपाली पाटील यांच्या समर्थकांनीही माधवी खंडाळकर यांच्यावर खोट्या आरोपांचा समाचार घेतला आहे.


