Shirole Nagarparishad Election: राज्यात नगरपरिषद व नगरपंचायत निवडणुका अगदी तोंडावर येत असताना, स्थानिक राजकारणात नवे वळण घेणाऱ्या हालचाली वेगाने घडू लागल्या आहेत. महायुतीत विस्कटलेले सूर आणि नाराजीचे वारे अधिक तीव्र होताना दिसत आहेत. या पार्श्वभूमीवर कोल्हापूरातून उभी राहिलेली नवीन राजकीय चाल सर्वांना धक्का देणारी ठरली आहे. शिरोळ आणि जयसिंगपूर या दोन्ही ठिकाणी अनेक वर्षांपासून कट्टर विरोधक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या भाजप आणि काँग्रेसने अचानक हातमिळवणी केली आहे. महादेव महाडिक यांच्या गटाचे भाजप नेते आणि सतेज पाटील यांच्या नेतृत्वाखालील काँग्रेस गट यांनी एकत्र लढण्याचा निर्णय घेतल्यामुळे स्थानिक राजकारणात खऱ्या अर्थाने खळबळ माजली आहे.
हेही वाचा –शरद पवारांना मोठा धक्का! देशमुखांचा अचानक राजीनामा; आता कोणाला देणार साथ?
यड्रावकरांना झटका
जयसिंगपूर–शिरोळ परिसरात शिवसेना (शिंदे गट) चे आमदार राजेंद्र यड्रावकर यांच्याविषयी आतापासूनच नाराजी उसळली होती. जिल्हाध्यक्ष राजवर्धन नाईक–निंबाळकर यांच्यासह अनेक भाजप पदाधिकाऱ्यांचे त्यांच्यासोबत सूर जुळत नसल्याचं उघडपणे बोललं जात होतंच. शेवटी या नाराजीचेच फलित म्हणून भाजपने काँग्रेससोबतची आघाडी स्वीकारल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगत आहे.
‘विकास आघाडी’च्या नावाने नवी पॅनेल रचना
काही दिवसांपासून चाललेल्या गुप्त चर्चेनंतर अर्ज मागे घेण्याची वेळ जवळ येताच दोन्ही पक्षांच्या प्रमुख नेत्यांनी निर्णायक बैठक घेतली. त्यातून ‘जयसिंगपूर विकास आघाडी’ या नावाने संयुक्त पॅनेल उभं करण्याचा निर्णय अंतिम करण्यात आला. यामुळे महायुतीच्या स्थानिक गणिताला मोठा धक्का बसला असून, शिंदे गट या परिसरात एकाकी पडल्याचे स्पष्ट संकेत मिळत आहेत.
परंपरागत विरोधी असलेल्या भाजप आणि काँग्रेसची अशी अनपेक्षित जवळीक केवळ कोल्हापुरातच नाही तर संपूर्ण महाराष्ट्रात राजकीय कुतूहलाचं कारण ठरत आहे. दोन वैचारिकदृष्ट्या विरुद्ध असलेले पक्ष एकत्र कसे आले? यामागे कोणती मोठी रणनीती दडली आहे? यावरून राज्यभरात तुफान चर्चा रंगू लागली आहे.


