Rohit Pawar: शिवसेनेचे दोन्ही गट भविष्यात पुन्हा एकत्र येण्याबाबत ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे यांनी केलेल्या विधानामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात तर्क-वितर्कांना उधाण आले आहे. या नव्या राजकीय समीकरणांच्या शक्यतेवर बोलताना राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यावर अत्यंत टोकदार शब्दांत टीका केली आहे. “शिंदेंची शिवसेना आणि अजितदादांची राष्ट्रवादी हे दोन्ही पक्ष आता दात नसलेल्या वाघासारखे झाले असून, ते केवळ सत्तेसाठी गुरगुरत आहेत,” असा खोचक टोला रोहित पवारांनी लगावला. हे दोन्ही गट भाजपची साथ सोडून जाण्याचे धाडस कधीही करू शकणार नाहीत, कारण त्यांची अस्वस्थता जनतेसाठी नसून निव्वळ सत्ते टिकवण्यासाठी असल्याचा घणाघात त्यांनी केला.
कांदा उत्पादकांच्या दुरवस्थेवरून वळसे-पाटलांना थेट आव्हान
शेतकऱ्यांच्या गंभीर प्रश्नांकडे सरकारचे लक्ष वेधण्यासाठी महाविकास आघाडीच्या वतीने पुणे-नाशिक महामार्गावरील मंचर येथे एका भव्य मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर बोलताना रोहित पवारांनी सरकारसह स्थानिक नेते दिलीप वळसे-पाटील यांच्यावर निशाणा साधला. “शेतकऱ्यांचे प्रश्न वातानुकूलित (AC) दालनात बसून सुटणारे नाहीत, त्यासाठी रस्त्यावर उतरून संघर्ष करावा लागतो,” असे सांगत पवारांनी सत्ताधाऱ्यांना थेट आव्हान दिले. “तुम्ही केवळ माध्यमंसमोर बोलता, पण प्रत्यक्षात बळीराजाच्या पाठीशी उभे राहत नाही. सत्ताधारी पक्ष सध्या केवळ विधानपरिषदेच्या जागा आणि तिकिटांसाठी आपापसात भांडत आहेत, घोडेबाजार करत आहेत; मात्र शेतकऱ्यांच्या हक्कासाठी भांडायला त्यांना वेळ नाही,” असा संताप त्यांनी व्यक्त केला.
घोषणा हवेतच, ‘नाफेड’ची खरेदी कागदावर
राज्यातील घसरत्या कांदा दरामुळे उत्पादक शेतकरी देशोधडीला लागला असून रोहित पवारांनी थेट आकड्यांसह सरकारची कोंडी केली आहे. निवडणुकीच्या तोंडावर सरकारने २४ रुपये दर देण्याचे आश्वासन दिले होते, मात्र सध्या व्यापाऱ्यांकडून शेतकऱ्यांची लूट सुरू असून नाफेडच्या नावाखाली केवळ मध्यस्थांचा फायदा केला जात असल्याचा आरोप त्यांनी केला. “व्यापारी कमी दराने कांदा घेऊन तो नाफेडला विकत आहेत. सरकारने तातडीने १० लाख टन कांदा थेट बळीराजाकडून खरेदी करावा आणि कांद्याला २५ रुपये हमीभाव द्यावा,” अशी आग्रही मागणी पवारांनी केली. केवळ बैठकांचे आणि आदेशांचे फार्स न करता, मुंबईत होणाऱ्या मंत्रिमंडळ बैठकीत शेतकऱ्यांच्या हिताचा ठोस निर्णय घ्यावा, असेही त्यांनी ठणकावून सांगितले.


