Sambhajinagar Paithan News : छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील पैठण तालुक्यातील कडेठाण गावात मानवतेचा अंत पाहणारी थरारक घटना घडली आहे. पोटचा मुलगा रामेश्वर कल्याण काळे (वय अंदाजे ३०) याने स्वतःच्या वडिलांची, कल्याण बाबुराव काळे (वय ६५) यांची, निर्दयी हत्या केली आणि त्यांचा मृतदेह घरातल्या खड्ड्यात गाडून टाकला. आठवडाभरानंतर घरातून येणाऱ्या प्रचंड दुर्गंधीमुळे शेजाऱ्यांनी पोलिसांना कळवले आणि या क्रूर कृत्याचा पर्दाफाश झाला.
मिळालेल्या माहितीनुसार, वडिल-मुलामध्ये शुल्लक कारणावरून वारंवार भांडणे होत होती. काही दिवसांपूर्वीच्या जोरदार वादात संतापाच्या भरात रामेश्वरने वडिलांवर हल्ला करून त्यांची गळा दाबून हत्या केली. कोणाला संशय येऊ नये म्हणून त्याने मृतदेह घरातील जमिनीत खड्डा खणून पुरला आणि वर सिमेंटचा चोपडा दिला.
आठवडा उलटल्यानंतर कुजलेल्या मृतदेहापासून प्रचंड दुर्गंधी पसरू लागली. शेजाऱ्यांना असह्य झाल्याने त्यांनी पाचोड पोलीस ठाण्यात तक्रार केली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन घराची झडती घेतली आणि खड्ड्यात पुरलेला मृतदेह बाहेर काढला. रामेश्वरने तात्काळ कबुली दिली आणि त्याला अटक करण्यात आली.
उपविभागीय पोलीस अधिकारी सुनील पाटील, पाचोड पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक सचिन पंडित यांच्या पथकाने त्वरित कारवाई करत मृतदेह पंचनामा करून शवचिकित्सेसाठी पाठवला. या अमानुष घटनेने कडेठाण आणि परिसरात भीतीचे वातावरण पसरले असून, लोकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे.


