इंदापूर : इंदापूर शहराचा विकास वेगाने पुढे नेण्यासाठी निधीची कमतरता कधीही जाणवू देणार नाही, असा ठाम संदेश राज्याचे कृषी मंत्री आणि आमदार दत्तात्रय भरणे यांनी मतदारांना दिला. इंदापूर शहरातील दर्गा मशीद चौक आणि श्रीराम कॉलनी परिसरात झालेल्या प्रचारसभेत त्यांनी महत्त्वपूर्ण घोषणा करत राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगराध्यक्ष पदाचे उमेदवार भरत शहा तसेच संपूर्ण पॅनेलला प्रचंड मताधिक्याने विजयी करण्याचे आवाहन केले. इंदापूर शहर दर्गा मशीद चौक, श्रीराम कॉलनी येथे मंत्री दत्तात्रय भरणे यांचा झंझावाती प्रचार दौरा संपन्न झाला.
दत्तात्रय भरणे पुढे म्हणाले, मी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रिमंडळात राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार व एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली काम करत आहे. मी आतापर्यंत चारवेळा आमदारकीची निवडणूक लढवली. मला एक वेळा पराभव स्वीकारावा लागला तर तीन वेळा मी विजयी झालो. तुमच्या आशीर्वादामुळे मी मंत्री देखील झालो. त्यामुळे कर्तव्य म्हणून इंदापूर शहराच्या विकासासाठी कोट्यावधी रुपयांचा निधी दिला असून आणखी देणार आहे. करमाळा व इंदापूर तालुक्याला जोडणारा ३८२ कोटी रुपयांचा भीमा नदीवरील पूल आगामी काळात इंदापूरचा पाचपट व्यापार वाढविणार आहेत तर भुयारी गटारासाठी ६१ कोटी, शहर रस्त्यांसाठी ९१ कोटी, क्रीडा संकुल साठी ५६ कोटी, नवीन नगरपरिषद इमारती साठी १० कोटी, युवापिढीस स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करण्यासाठी ५ कोटी रुपयांची अभ्यासिका यासाठी निधी दिला असून विकसित इंदापूर शहर म्हणून शहराची नवीन ओळख निर्माण झाली आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांचे आजोबा मालोजीराजे यांची गढी संवर्धन तसेच चांदशहवली बाबा दर्गा यासाठी देखील निधी दिला आहे. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, नगररचना विभाग तसेच जिल्हा नियोजन मंडळाच्या माध्यमातून आमदार म्हणून मी जास्तीचा निधी आणू शकतो. त्यामुळे स्वच्छ प्रतिमा व पारदर्शी कारभार करणारे भरत शहा यांच्यासह पॅनेलला भरघोस मताधिक्याने विजयी करा असे आवाहन त्यांनी केले.
हेही वाचा – इंदापूर नगरपरिषद निवडणुकीत मोठी राजकीय घडामोड; उबाठाचा कृष्णा-भिमा विकास आघाडीला जाहीर पाठिंबा
यावेळी भरत शहा म्हणाले, राजकारणात लोक पदे मिळवण्या साठी प्रयत्न करतात मात्र मी चार पदांचा राजीनामा देऊन बाहेर पडलो आहे. त्यानंतर नगराध्यक्षा अंकिता मुकुंद शहा यांच्या माध्यमातून शहर स्वच्छता अभियानात चांगले काम सलग पाच वर्ष करून शहरास राष्ट्रीय पातळीवर झळकवले तसेच २२ कोटी रुपयांचा निधी मिळवून दिला. आमच्यावर आरोप करणाऱ्यांनी स्वतःचे आत्मपरीक्षण करणे गरजेचे आहे. इंदापूर नगरपरिषद डिजिटल झाली आहे. त्यामुळे शासनास सर्व बाबी माहिती पडतात. तुम्ही पाच वर्ष झाले शास्ती साठी आंदोलन करत आहात मात्र एकही शासकीय अधिकारी शास्ती चुकीची लावली असे म्हणत नाही कारण विनापरवाना बांधकाम, मान्यतेपेक्षा जास्त बांधकाम, बांधकाम करताना रस्ता सोडला नाही या व इतर कारणांनी शासन नियमाप्रमाणे शास्ती लागली आहे. ती देखील कमी करण्यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत. ज्या लोकांना घरकुल मंजूर आहे, पण जागा नावावर नाहीत त्यांच्यासाठी देखील प्रयत्न करत आहोत. शास्तीवर खोटे बोल पण रेटून बोलणाऱ्यांचा त्यांनी यावेळी खरपूस समाचार घेतला. आतापर्यंत केलेल्या विकासामुळे आमचा पॅनेलचा २१ विरुद्ध शून्य असा विजय निश्चित असल्याचा दावा त्यांनी आत्मविश्वास पूर्वक केला.
दरम्यान, यावेळी पुणे जिल्हा बँकेचे संचालक आप्पासाहेब जगदाळे, तालुकाध्यक्ष हनुमंत कोकाटे, आरपीआय आठवले गटाचे बाळासाहेब सरवदे, माजी नगराध्यक्ष अशोक इजगुडे, शकीलभाई सय्यद, पोपटराव पवार, उज्ज्वला चौगुले, सुधीर मखरे, रमेश शिंदे आदींची भाषणे झाली.
ज्या झाडाला फळ आहे, त्याच झाडाला लोक दगडे मारतात- भरणे
जे भरतशेठ व माझ्यावर टीका करत आहेत, त्यांच्याकडे लक्ष देण्याचे काही कारण नाही. ज्या झाडाला फळ आहे, त्याच झाडाला लोक दगडे मारतात. त्यामुळे टीका करणाऱ्यांना विकास करून उत्तर देणार असे म्हणत मंत्री दत्तात्रय भरणे यांनी माजी मंत्री हर्षवर्धन पाटील, प्रदीप गारटकर तसेच प्रवीण माने यांच्यावर अप्रत्यक्ष टीका केली.


