Indapur Municipal Council Elections: इंदापूर नगरपरिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीपूर्वी स्थानिक राजकारणात मोठा बदल घडला आहे. उद्धव बाळासाहेब ठाकरे (उबाठा) पक्षाने अधिकृतपणे कृष्णा-भिमा विकास आघाडीला पाठिंबा जाहीर केला आहे. हा निर्णय पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि आमदार सचिन अहिर यांच्या सूचनेनुसार घेण्यात आल्याचे पक्षाने जाहीर केले. शुक्रवारी (दि. 21) झालेल्या पत्रकार परिषदेत तालुकाप्रमुख नितीन शिंदे, शहरप्रमुख महादेव सोमवंशी, शिवसेनेचे ज्येष्ठ नेते भिमराव भोसले, विशाल बोंद्रे, तसेच कृष्णा-भिमा विकास आघाडीचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार प्रदीप गारटकर, माजी मंत्री हर्षवर्धन पाटील आणि मयुरसिंह पाटील उपस्थित होते.
यावेळी बोलताना कृष्णा-भिमा विकास आघाडीचे अधिकृत नगराध्यक्ष पदाचे उमेदवार प्रदीप गारटकर म्हणाले, 2004 साली मी शिवसेना पक्षात माजी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या उपस्थितीत प्रवेश केला होता. मला पक्षाने इंदापूर विधानसभेसाठीची उमेदवारी दिली होती. स्व.बाळासाहेब ठाकरे यांच्याशी माझे घनिष्ठ संबंध होते. शिवसेना पक्ष हा लढवय्या पक्ष आहे. अन्यायाविरुद्ध आवाज उठवणारा पक्ष आहे. मी माझ्या राजकीय कार्यकीर्दीत सर्व पक्षात प्रामाणिकपणे काम केले आहे. इंदापूर नगरपरिषद निवडणुकीत निष्ठावंत, सर्वसामान्य कार्यकर्त्यास नगराध्यक्ष पदाची निवडणूक लढविण्याची संधी राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार ) पक्षाच्या वतीने मिळावी अशी माझी प्रामाणिक इच्छा होती. परंतु पक्षश्रेष्ठी, तालुक्याचे लोकप्रतिनिधी यांनी आम्हाला पैसेवाला उमेदवार पाहिजे असे सांगून कॅबिनेट मंत्र्यांनी पैसेवाल्याला पुढे लोटांगण घातले असल्याचा आरोप गारटकर यांनी केला.
हेही वाचा – इंदापूरमध्ये कृष्णा-भिमा स्थानिक विकास आघाडी स्थापन; वरिष्ठ नेत्यांसोबतच्या चर्चेनंतर मोठा निर्णय
दरम्यान, माजी मंत्री हर्षवर्धन पाटील म्हणाले, उद्धव बाळासाहेब ठाकरे हिच खरी शिवसेना असे सांगून त्यांनी ही कृष्णा-भिमा आघाडी ला पाठिंबा दर्शवला. दोन दिवसांपूर्वी राष्ट्रीय समाज पक्षानेही आघाडीला आपला पाठिंबा दिला होता. आता तालुक्यातील उरलेले बाकीचेही आघाडीबरोबर येतील असा सुतोवाच पाटील यांनी केला. यावेळी उबाठाच्या वतीने नगरपरिषद निवडणुकीसाठी नगराध्यक्ष पदाचे उमेदवार महादेव सोमवंशी, नगरसेवक पदाचे उमेदवार मेजर खंडागळे यांनी आपले उमेदवारी अर्ज माघार घेण्यात येणार असल्याचे सांगितले. इंदापूर नगरपरिषद निवडणुकीत या राजकीय एकजुटीमुळे स्थानिक समीकरणे बदलण्याची दाट शक्यता आहे. सत्तेसाठीची लढत आता अधिकच रंगतदार होणार आहे.


