Snake Entered Thane District Hospital: ठाणे सिव्हिल हॉस्पिटलमध्ये मंगळवारी एक अजब आणि धक्कादायक घटना घडली. महिला वॉर्डमध्ये अचानक एका रुग्णाच्या पिशवीतून साप बाहेर पडल्याने रुग्ण, त्यांच्या नातेवाईकांमध्ये आणि कर्मचाऱ्यांमध्ये मोठी पळापळ झाली. तपासात उघड झाले की हा साप एका 19 वर्षीय तरुणाने स्वतःसोबत हॉस्पिटलमध्ये आणला होता.
नेमकं काय घडलं?
ठाण्यात राहणाऱ्या 19 वर्षीय ओंकार राठोडला परिसरातील पाण्याच्या टाकीजवळ एक बिनविषारी धामण साप दिसला. साप पकडताना तो त्याला चावला. त्यामुळे तो उपचारांसाठी ठाणे सिव्हिल हॉस्पिटलमध्ये गेला. डॉक्टरांनी उपचार केले, पण ओंकारने सापाला सोडण्यास नकार दिला आणि त्याला एका पिशवीत ठेवून थेट महिला वॉर्डमध्ये गेला.
वॉर्डमध्ये गोंधळ
काही मिनिटांतच साप पिशवीतून बाहेर पडला आणि वॉर्डमध्ये फिरू लागला. साप बेडखाली, सलाईन स्टँडजवळ आणि रुग्णांच्या पायांखाली सरकताच महिलांनी किंचाळत बेडवरून उड्या मारल्या. काही रुग्ण खुर्च्यांवर चढले, तर काही हातात सलाईन घेऊन कोपऱ्यात उभे राहिले. कर्मचाऱ्यांनीही सुरक्षित अंतर ठेवण्याचा प्रयत्न केला.
हेही वाचा –ठाणे महानगरपालिकेत शिवसेना ठाकरे गट आणि मनसे एकत्र लढणार; संजय राऊत यांची मोठी घोषणा
दरम्यान, आरडाओरडा ऐकून ओंकार पुन्हा वॉर्डमध्ये धावत आला. त्याने कोणतेही साधन न वापरता साप हाताने पकडला. तत्काळ रुग्णालय प्रशासनाने सर्प बचाव पथकाला बोलावले. पथकाने साप बिनविषारी असल्याची पुष्टी केली आणि त्याला सुरक्षितपणे जंगलात सोडण्यात आले. ठाणे सिव्हिल हॉस्पिटलचे सर्जन डॉ. कैलाश पवार म्हणाले, तरुणावर उपचार केले, पण त्याच्या निष्काळजीपणामुळे साप वॉर्डमध्ये गेला. सुदैवाने साप विषारी नव्हता, अन्यथा गंभीर परिणाम झाले असते. रुग्णालयात साप आणणे अत्यंत धोकादायक आणि नियमबाह्य आहे. हॉस्पिटल प्रशासनाने या प्रकरणाची गंभीर नोंद घेतली असून तरुणावर आवश्यक कारवाई केली जात आहे.
सध्या परिस्थिती सामान्य
साप सुरक्षितपणे जंगलात सोडण्यात आला असून हॉस्पिटलमधील परिस्थिती सामान्य झाली आहे. परंतु या संपूर्ण घटनेने रुग्णालयातील सुरक्षेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहेत.


