पिंपरी-चिंचवड: पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावर कारने पेट घेतल्याची घटना घडली. भरधाव कारने अचानक पेट घेतल्याची ही घटना दुपारी साडेबारा वाजण्याच्या सुमारास अमृतांजन पुलाजवळ घडली. सुदैवाने कारमधील सर्व प्रवासी सुखरूप आहेत. अचानक कारमधून धूर निघू लागल्याने चालकाने वाहन महामार्गाच्या बाजूला घेऊन थांबवले.
स्थितीचा अंदाज घेत प्रवाशांनी तत्काळ कारच्या बाहेर पडत जीव वाचवला. त्यानंतर काही क्षणांतच कारने पूर्णपणे पेट घेतला. काही वाहनचालक मात्र कार जवळून धोकादायक रीतीने प्रवास करत असल्याचे पाहायला मिळाले. घटनेत कार जळून खाक झाली आहे.
घटनेची माहिती मिळताच आयआरबीच्या अग्निशमन दलाने तातडीने धाव घेत आगीवर नियंत्रण मिळवले. या घटनेमुळे द्रुतगती मार्गावरील वाहतूक काही काळ विस्कळीत झाली होती. घटनास्थळी बोरघाट महामार्ग पोलीस दाखल झाले होते. पोलिसांनी वाहतूक सुरळीत केली. अद्याप आगीचे नेमके कारण समोर आलेले नाही.


