Cough Syrup Prescription: देशभरात कफ सिरपमुळे उद्भवलेल्या मृत्यूंच्या वाढत्या घटनांनी चिंतेचा विषय निर्माण केला असून, याच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने कफ सिरप विक्रीसंबंधी मोठा निर्णय लागू केला आहे. आता पुढे देशातील कोणत्याही औषध दुकानात डॉक्टरांचे लिखित प्रिस्क्रिप्शन नसताना कफ सिरप दिले जाणार नाही. औषध सल्लागार समितीच्या 67व्या बैठकीत या निर्णयाला मंजुरी देण्यात आली.
मध्य प्रदेशातील छिंदवाडा आणि जवळच्या भागांत अलीकडेच कफ सिरप घेतल्यानंतर किडनी फेल होऊन किमान 24 मुलांचा मृत्यू झाला. या घटनेने राज्यासह देशभरात खळबळ उडाली. राजस्थान, गुजरात आणि इतर राज्यांतही अशाच प्रकारच्या घटना नोंदल्या गेल्या. इतकेच नाही, तर परदेशातही भारतीय कफ सिरपमुळे झालेल्या मृत्यूंच्या प्रकरणांनी भारताची जागतिक प्रतिमा धोक्यात आली. वाढत्या धोक्यांचा विचार करून केंद्राने कफ सिरपची ओव्हर-द-काउंटर विक्री थांबवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे आता ग्राहकांना सिरप खरेदी करण्यासाठी डॉक्टरांची चिठ्ठी अनिवार्य राहणार आहे.
हेही वाचा – चिमुकल्यांच्या मृत्यूचं तांडव काही थांबेना! कफ सिरप प्यायल्याने नागपूरात 18 महिन्याच्या मुलीचा मृत्यू
गेल्या काही वर्षांत उझबेकिस्तान, इंडोनेशिया आणि गांबिया येथे भारतीय कफ सिरपच्या सेवनामुळे 200 हून अधिक मुलांचे मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. उझबेकिस्तानमध्ये तर 68 मुलांच्या मृत्यूशी संबंधित प्रकरणात 21 जणांना शिक्षा ठोठावली गेली. जागतिक आरोग्य संघटनेने (WHO)ही भारतातील काही कंपन्यांच्या भेसळयुक्त उत्पादनांची नोंद केली असून त्यात श्रीसन फार्मास्युटिकल्सचे ‘कोल्ड्रिफ’, रेडनेक्स फार्मास्युटिकल्सचे ‘रेस्पिफ्रेश TR’ आणि शेप फार्माचे ‘रिलाइफ’ या सिरपचा उल्लेख आहे.


