Angar Municipal Council Election: सोलापूरच्या अनगर नगरपरिषदेच्या निवडणुकीची राज्यभरात चर्चा आहे. राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) गटाच्या उमेदवार उज्वला थिटे यांचा उमेदवारी अर्ज बाद झाल्यानंतर आता संपूर्ण निवडणूक प्रक्रियेलाच अचानक स्थगिती देण्यात आली आहे. या निर्णयावर थिटेंनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे. अर्ज बाद प्रकरण आणि त्यावरील न्यायालयीन धावपळीच्या पार्श्वभूमीवर थिटेंनी स्पष्ट शब्दांत नाराजी व्यक्त केली. त्या म्हणाल्या, ‘नगराध्यक्षपदाची निवडणूक स्थगित झाल्याचा आम्हाला आनंदच आहे. नियतीनेच फासे फिरवले आहेत. पाटील कुटुंब किती वेळा आनंद साजरा करणार? माझ्या अर्जावर तांत्रिक आडकाठी आणली, अर्ज भरताना मुद्दाम अडथळे निर्माण करण्यात आले. आता नियतीचे फासे फिरले.’
थिटेंनी जिल्हा न्यायालयात दाखल केलेले अपीलही फेटाळण्यात आले. त्याबाबत त्या म्हणाल्या, न्यायालयात गेल्यावरही कागदपत्रे गायब झाल्याचा प्रकार समोर आला. आमच्या विरोधात निकाल दिला पण त्या निकालाची प्रत अद्याप मिळालेली नाही. प्रत मिळताच आम्ही उच्च न्यायालयात आव्हान देऊ. त्या पुढे म्हणाल्या की 20 तारखेपर्यंत या निर्णयाला स्थगिती आहे. उच्च न्यायालयाचा निकाल येईपर्यंत निवडणूक थांबवावी अशी मागणीही करण्यात येणार आहे.
हेही वाचा – सोलापूरमध्ये राजकीय भूकंप; अनगर नगरपंचायतसह २ नगराध्यक्षपद व ६ नगरसेवक निवडणुका स्थगित, काय आहे कारण?
अर्ज बाद कसा झाला?
अनगर नगराध्यक्ष पदासाठी थिटे यांनी अर्ज दाखल केला होता. मात्र त्यांच्या उमेदवारीपत्रावर सुचकाची सही नसल्याचे नमूद करून निवडणूक अधिकाऱ्यांनी त्यांचा अर्ज अमान्य ठरवला. या निर्णयाविरोधात थिटेंनी प्रथम जिल्हा न्यायालयाचा दरवाजा ठोठावला. परंतु अपील फेटाळल्याने आता पुढचा टप्पा उच्च न्यायालय असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. हायकोर्ट नाकारले तर आम्ही सर्वोच्च न्यायालयातही जाण्यास तयार आहोत, असे थिटेंनी सांगितले आहे.
निवडणूक स्थगितीमुळे अनगरची उत्सुकता वाढली
थिटेंचा अर्ज बाद, न्यायालयीन लढाई, आणि आता निवडणुकीला अचानक मिळालेली स्थगिती, या सर्व घडामोडींमुळे अनगर नगरपरिषदेतील राजकीय समीकरणे ढवळून निघाली आहेत.


