Swaraj Kaushal Death: माजी परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांचे पती आणि भाजप खासदार बांसुरी स्वराज यांचे वडील स्वराज कौशल यांचे गुरुवारी (४ डिसेंबर) वयाच्या ७३ व्या वर्षी निधन झाले. दिल्ली भाजपने अधिकृतरित्या सांगितले की त्यांचे अंत्यसंस्कार गुरुवारी लोधी रोड स्मशानभूमीत पार पडतील. स्वराज कौशल हे मिझोरामचे माजी राज्यपाल आणि देशातील वरिष्ठ विधिज्ञ म्हणून ओळखले जात होते. त्यांच्या निधनानंतर राजकीय तसेच कायदा क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर शोक व्यक्त केला जात आहे.
राजकीय नेत्यांकडून श्रद्धांजली
दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांनी सोशल मीडियावर श्रद्धांजली अर्पण करत म्हटले की, मिझोरामचे माजी राज्यपाल आणि ज्येष्ठ वकील श्री. स्वराज कौशल यांचे निधन अत्यंत दुःखद आहे. सार्वजनिक जीवनातील त्यांचे योगदान नेहमी स्मरणात राहील. या कठीण काळात खासदार बांसुरी स्वराज आणि त्यांच्या कुटुंबियांस माझ्या मनापासून संवेदना आहेत.
हेही वाचा – राज्यातील भाजपच्या सर्व खासदारांनी घेतली पंतप्रधान मोदींची भेट; महत्वांच्या विषयांवर झाली चर्चा
बांसुरी स्वराज यांची भावनिक प्रतिक्रिया
आपल्या वडिलांच्या निधनानंतर बांसुरी स्वराज यांनी X (पूर्वीचा ट्विटर) वर भावूक संदेश शेअर केला. त्यांनी म्हटलं की, ‘पापा… तुमचे प्रेम, शिस्त, साधेपणा आणि देशभक्ती हा माझ्या जीवनाचा दीपस्तंभ आहे. तुम्ही आम्हाला सोडून गेलात ही वेदना असह्य आहे, पण तुमचा वारसा आणि मूल्ये माझ्या प्रत्येक पावलाला मार्गदर्शन करतील. ओम शांती.’ राजकीय आणि कायदा क्षेत्रातील नेत्यांकडून त्यांच्या निधनावर श्रद्धांजली आणि हळहळ व्यक्त केली जात आहे.


