BJP Vs MNS: उरणमध्ये काही दिवसांपूर्वी भाजप आणि मनसे पदाधिकाऱ्यांमध्ये जोरदार राडा झाल्याची घटना घडली होती. आता त्या प्रकरणाला वेगळं वळण मिळालं आहे. मनसे पदाधिकाऱ्याला भाजपच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांकडून मारहाण केल्याची घटना गुरुवारी रात्री घडली. ही मारहाण मनसे कार्यकर्त्याच्या आईसमोरच केल्याचा आरोप असून या प्रकरणामुळे परिसरात राजकीय तणाव निर्माण झाला. भाजप आमदार महेश बालदी यांच्या विरोधात बोलल्याबद्दल ही मारहाण झाली. त्यामुळे सतीश पाटील यांना जबरदस्तीने माफी मागायला लावली.या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने आता प्रकरणाला अधिक गांभीर्य आले आहे.
उरण पोलीस स्थानकात तक्रार दाखल
मारहाण आणि जबरदस्तीने माफी मागायला लावली या प्रकरणी मनसेच्या पदाधिकाऱ्याकडून उरण पोलीस स्थानकात तक्रार दाखल करण्यात आली आहे. या प्रकरणात अद्याप भाजप आमदार महेश बालदी यांची प्रतिक्रिया समोर आलेली नाही. मात्र, या घटनेमुळे राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे.
दरम्यान, वरळी येथील पंचतारांकित सेंट रेजीस हॉटेलबाहेर शुक्रवारी शिवसेना कामगार संघटना आणि भाजप कामगार संघटना यांच्यात जोरदार हाणामारी झाली. हॉटेलमधील कामगारांच्या संघटनेची मान्यता आणि युनियन हडप प्रकरणावरून हा वाद चिघळा. दरम्यान, प्रकरणाची माहिती घेऊन कारवाई केली जाईल, अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे. सेंट रेजीस सारख्या आंतरराष्ट्रीय दर्जाच्या हॉटेलबाहेर घडलेल्या या घटनेमुळे मुंबईतील कामगार राजकारण पुन्हा चर्चेत आले आहे.
गेल्या काही दिवसांपासून सेंट रेजीस हॉटेलमधील कामगारांचे प्रतिनिधित्व कोणत्या संघटनेकडे असावे, यावरून दोन्ही गटांमध्ये तणाव वाढला होता. शिवसेनेचा आम्ही गेल्या अनेक वर्षांपासून कामगारांसाठी लढत आहोत, असा दावा आहे. तर, कामगारांचा मोठा भाग आपल्यासोबत असल्याचे भाजपचे म्हणणे आहे. या सर्व घडोमोडींच्या पार्श्वभूमीवर शुक्रवारी दुपारी शिवसेनेच्या (ठाकरे) कार्यकर्त्यांनी हॉटेलबाहेर निदर्शने केली. त्यानंतर भाजप कामगार संघटनेचे कार्यकर्तेही तेथे पोहोचले आणि घोषणाबाजी सुरू झाली. काही वेळातच वाद हातघाईवर गेला. पोलिसांनी यात तत्काळ हस्तक्षेप करून दोन्ही बाजूंना शांत केले आणि गर्दी पांगवल्याचे पाहायला मिळाले.


