Pune Crime: पुण्यातील सहकार क्षेत्राला हादरवणारी घटना उघड झाली असून, आठ कोटींची लाच मागणी करणाऱ्या लिक्विडेटर आणि ऑडिटरला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (ACB) रंगेहात पकडले आहे. पहिल्या हप्त्याच्या रूपाने ३० लाख रुपये स्वीकारताना दोघांना शनिवार पेठेतील एका कार्यालयाबाहेर अटक करण्यात आली. धनकवडी परिसरातील एकता सहकारी संस्थेच्या जमिनीशी संबंधित प्रकरणावरून हा संपूर्ण प्रकार घडला. २००५ मध्ये स्थापन झालेल्या या संस्थेत ३२ सभासद असून, २०२० पासून अंतर्गत वाद वाढल्याने प्रशासकीय हस्तक्षेपाची वेळ आली. यानंतर २०२४ मध्ये सहकार विभागाने विनोद देशमुख यांची लिक्विडेटर म्हणून नियुक्ती केली होती.
ACB ने दोघांना रंगेहात पकडलं
तक्रारीनुसार, देशमुख यांनी सभासदांना शेअर सर्टिफिकेट मिळवण्यासाठी तब्बल तीन कोटींची लाच मागितली. संस्थेची जागा विक्री करण्यासाठी परवानगी हवी असल्यास आणखी पाच कोटींची मागणी करण्यात आली. या एकूण आठ कोटींच्या व्यवहारातून ३० लाख रुपयांचा पहिला हप्ता स्वीकारताना देशमुख आणि त्यांच्या सोबतीला ऑडिटर भास्कर पोळ हे दोघे जाळ्यात अडकले.
हेही वाचा –पुणे महानगरपालिका निवडणुकीत दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार? शरद पवारांची स्पष्ट भूमिका
एसीबीने रचला सापळा
दरम्यान, ५ डिसेंबर २०२५ रोजी तक्रारदाराने एसीबीकडे धाव घेतली. तपासादरम्यान मागणी खरी असल्याचे सिद्ध झाल्यानंतर एसीबीने सापळा रचला. तक्रारदाराच्या कार्यालयासमोर पंचांसमोर रक्कम स्वीकारताच अधिकाऱ्यांनी दोघांना ताब्यात घेतले. अधीक्षक शिरीष सरदेशपांडे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई झाली. पुणे विभागातील सहकारी संस्थांच्या इतिहासात लिक्विडेशन प्रक्रियेत एवढ्या मोठ्या रकमेची लाच मागण्याची ही पहिलीच नोंदवलेली घटना असल्याची माहिती एसीबीकडून देण्यात आली आहे.


