Saptashrungi Gad Accident: नाशिक जिल्ह्यातील सप्तशृंगी देवीच्या दर्शनासाठी आलेल्या भाविकांवर दुर्दैवाने काळाने घाला घातला. सप्तशृंगी गडावरून परतत असताना, गणपती पॉइंटजवळ एक इनोव्हा कार (एमएच 15 बीएन 0555) सुमारे 1000 ते 1200 फूट खोल दरीत कोसळून भीषण अपघात झाला. या अपघातात कारमधील पाच जणांना आपला जीव गमवावा लागल्याची माहिती समोर आली आहे.
या दुर्घटनेत दोन महिला आणि तीन पुरुषांचा समावेश असून, कारमध्ये एकूण सात प्रवासी होते. अपघाताची माहिती मिळताच स्थानिक नागरिक, पोलीस आणि आपत्ती व्यवस्थापन पथकांनी तातडीने मदतकार्य सुरू केले आहे. मात्र, दरीची प्रचंड खोली आणि दुर्गम भाग यामुळे मदतकार्यात मोठ्या अडचणी येत आहेत.
नेमकी दुर्घटना कशी घडली?
मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, भाविक देवीचे दर्शन घेऊन परतीच्या मार्गावर होते. दुपारी गणपती पॉइंटजवळ असताना, चालकाचे नियंत्रण सुटल्यामुळे कारने संरक्षक कठडा तोडला आणि थेट खोल दरीत कोसळली. अपघातानंतर तातडीने बचावकार्य सुरू करण्यात आले असून, मृतदेह दरीतून बाहेर काढण्याचे काम सुरू आहे. अद्याप मृतांची ओळख पटलेली नाही.
बांधकाम विभागाच्या कामावर ग्रामस्थांची तीव्र नाराजी
या अपघातानंतर स्थानिक नागरिकांनी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कामावर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. घाटाच्या काही भागातील संरक्षक भिंतींचे काम अपूर्ण असल्यामुळे हा अपघात घडल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. संरक्षणाची पुरेशी व्यवस्था नसताना या रस्त्यावरून वाहतूक सुरू असल्याने अशा दुर्घटना घडत असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. या भीषण अपघातामुळे सप्तशृंगीगड परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.


