पुणे : कोथरूडमधील शास्त्रीनगर गोळीबार प्रकरणातील मुख्य आरोपी कुख्यात गुंड नीलेश घायवळ याच्या टोळीला शस्त्रपुरवठा करणाऱ्या रॅकेटचा पर्दाफाश झाला आहे. घायवळचा निकटवर्तीय अजय सरोदे याला बनावट कागदपत्रांवर पिस्तूल परवाना मिळवून देणाऱ्या दलाल नीलेश फाटक याने एकट्याने तब्बल १६ जणांना खोट्या पत्त्याच्या आधारे शस्त्र परवाने काढून दिल्याचे चौकशीत उघड झाले आहे.
१७ सप्टेंबर रोजी कोथरूडमध्ये झालेल्या गोळीबारानंतर अटक झालेल्या अजय सरोदे याच्याकडून पोलिसांना परवाना सापडला. पुढील तपासात हा परवाना येरवडा परिसरातील बनावट पत्त्यावर आणि खोट्या प्रतिज्ञापत्रावर २९ जानेवारी २०२४ रोजी काढल्याचे निष्पन्न झाले. सरोदेवर यापूर्वीच दोन गुन्हे दाखल असतानाही त्याने गुन्ह्यांची माहिती लपवली होती.
पोलिसांनी सरोदेच्या घरी छापा टाकला असता तब्बल ४०० जिवंत काडतुसे जप्त झाली. त्यानंतर तपासाची सूत्रे फिरवत पोलिसांनी शस्त्र परवाना देणाऱ्या मुख्य दलालाची ओळख पटवली. तो दलाल म्हणजे नीलेश फाटक. चौकशीत फाटकने कबुली दिली की, त्याने सरोदेसह आणखी १५ जणांना बनावट रहिवासी पुरावा, खोटी प्रतिज्ञापत्रे तयार करून पिस्तूल परवाने मिळवून दिले आहेत.
पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांच्या सूचनेनुसार या सर्व १५ परवानाधारकांची यादी तयार करण्यात आली असून त्यांच्या मूळ फाइल्स तपासासाठी मागवण्यात आल्या आहेत. कोथरूड पोलीस ठाण्यात नीलेश फाटक याच्याविरुद्ध आर्म्स अॅक्टसह फसवणुकीचे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
या खुलाशामुळे नीलेश घायवळ टोळीला मोठ्या प्रमाणात शस्त्रपुरवठा करणारे संपूर्ण रॅकेट उघडकीस येण्याची शक्यता आहे. तपास युद्धपातळीवर सुरू असून लवकरच आणखी काही धक्कादायक बाबी समोर येण्याची चिन्हे आहेत.


