Ganesh Naik : महाराष्ट्रात मानवी वस्तीवर बिबट्यांच्या हल्ल्यात झपाट्याने वाढ होत असताना राज्याचे वनमंत्री गणेश नाईक यांनी मंगळवारी अत्यंत विचित्र आणि वादग्रस्त उपाययोजना जाहीर केल्या आहेत. बिबटे जंगलाबाहेर येऊ नयेत यासाठी प्रत्येक जंगलात मोठ्या प्रमाणात शेळ्या-बकऱ्या सोडण्यात येणार असून, काही भागातील अतिरिक्त बिबटे आफ्रिकेत आणि वनतारा येथे हलवले जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.
“बिबट्यांना जंगलातच भक्ष्य मिळाले पाहिजे. त्यासाठी राज्य सरकारने प्रत्येक जिल्ह्यात टॅग लावलेल्या शेळ्या-बकऱ्या सोडण्याचा निर्णय घेतला आहे. पुणे जिल्ह्यातील जुन्नर, आंबेगाव, शिरुर भागात ही योजना आधीच सुरू झाली आहे. जसा प्रत्येक गावात एक नंदी असतो, तशाच या शेळ्या-बकऱ्या असतील. नागरिकांनी या शेळ्यांचे रक्षण करावे, जेणेकरून बिबटे गावात येऊन कुत्रे किंवा माणसांवर हल्ला करणार नाहीत,” असे आवाहन गणेश नाईक यांनी केले.
ते पुढे म्हणाले, “आज बिबटे जंगलात कमी आणि ऊसाच्या फडात जास्त दिसतात. त्यामुळे त्यांची संख्या वेगाने वाढली आहे. बिबट्यांना शेड्यूल-१ मधून शेड्यूल-२ मध्ये टाकण्याचा प्रस्ताव केंद्राकडे पाठवला आहे. तसेच काही बिबट्यांची नसबंदी करण्याची परवानगी मिळाली आहे.”
आफ्रिकेला बिबटे पाठवण्याचा प्रस्ताव
गणेश नाईक म्हणाले, “आफ्रिकेत वाघ-सिंह आहेत पण बिबटे नाहीत. त्यामुळे महाराष्ट्रातील अतिरिक्त बिबटे तिकडे पाठवावेत का, याबाबत केंद्राला लेखी प्रस्ताव पाठवण्यास सांगितले आहे. तसेच काही बिबटे वनताराला (विरार) हलवले जातील.”
या घोषणांमुळे वन्यजीव तज्ज्ञ, पर्यावरणवाद्यांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. “जंगलात एक कोटी शेळ्या सोडणे ही पर्यावरणीय दृष्ट्या आत्मघातकी कल्पना आहे. तसेच आफ्रिकन इकोसिस्टममध्ये भारतीय बिबटे सोडणे आंतरराष्ट्रीय कायद्यांचे उल्लंघन ठरेल,” अशी प्रतिक्रिया वन्यजीव अभ्यासकांनी व्यक्त केली आहे.


