मुंबई : अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चन अलीकडेच रेड सी फिल्म फेस्टिव्हलमध्ये दिसली होती. यानंतर तिची सर्वत्र चर्चा सुरु झाली. या फेस्टिव्हल इव्हेंटमध्ये ऐश्वर्या राय तिच्या कारकिर्दीबद्दल, प्रवासाबद्दल आणि इतर अनेक मुद्द्यांबद्दल उघडपणे बोलताना दिसली. यामध्येच तिने लेक आराध्याबाबत भाष्य केले. आराध्या बच्चन सोशल मीडियावर नसल्याचे सांगितले.
ऐश्वर्या रायने मुलगी आराध्याच्या नावाने ऑनलाईन चालणारी कोणतीही पेज स्वत: अथवा तिच्या कुटुंबाने तयार केलेली किंवा चालवलेली नाहीत. तिने त्या पेजवर असलेल्या फॅन्सचे आभारही मानले. मात्र, यापैकी कोणतेही अकाउंट तिच्या मुलीचे नाहीत. असे स्पष्टीकरण दिले आहे. ऐश्वर्या आणि अभिषेक बच्चन यांचे लग्न २००७ मध्ये झाले. त्यांना आराध्या ही मुलगी आहे. ऐश्वर्या म्हणाली, “कधीकधी लोक असे गृहीत धरतात की बाहेरून दिसणारे सारं काही खरं असतं. मात्र, तसं नसतं. आराध्याचे अकाउंट एखाद्या चाहत्याने तयार केले असावे. कदाचित त्यांनी तिच्या, आमच्या कुटुंबाच्या आणि माझ्यावरील प्रेमापोटी असे केले असेल.” त्याबद्दल धन्यवाद, पण ते अकाउंट तिचे नाही. आराध्या सोशल मीडियावर नाही.
ऐश्वर्या रायने तिच्या सोशल मीडिया अॅक्टिव्हिटीबद्दलही स्पष्टीकरण दिले, ती म्हणाली की ती बहुतेकदा व्यावसायिक काम, ब्रँड आणि सहयोगासाठी या प्लॅटफॉर्मचा वापर करते. सोशल मीडिया आज जीवनाचा एक भाग आहे. लोक त्यांचे काम, व्यावसायिक अपडेट्स आणि करिअरच्या संधी शेअर करण्यासाठी त्याचा वापर करतात. मात्र, इतरांप्रमाणे ऐश्वर्या राय ऍक्टिव्ह दिसत नाही.


