Pune Cold Wave : पुणे शहर आणि परिसरात उत्तरेकडून येणाऱ्या थंड वाऱ्यांमुळे हिवाळ्याची तीव्रता वाढली आहे. निरभ्र आकाश आणि कोरड्या वातावरणामुळे सकाळी हुडहुडी भरवणारा गारठा जाणवत आहे. शनिवारी (१३ डिसेंबर) पाषाण परिसरात हंगामातील सर्वात कमी ८.३ अंश सेल्सिअस किमान तापमानाची नोंद झाली, तर शहराचे सरासरी किमान तापमान ८.८ अंश आणि कमाल तापमान २९ अंश सेल्सिअस राहिले.
हवामान विभागाच्या अंदाजानुसार, पुढील दोन दिवस तापमान स्थिर राहण्याची शक्यता आहे. मात्र, त्यानंतर किंचित वाढ होईल. रविवारी (१४ डिसेंबर) किमान तापमान ९ अंश आणि कमाल २९ अंश अपेक्षित आहे. मंगळवारपासून (१६ डिसेंबर) कमाल तापमान ३० अंशांपर्यंत आणि किमान १० अंशांपर्यंत वाढण्याची शक्यता आहे. आकाश निरभ्र राहील, सकाळी विरळ धुके पडू शकते. उपनगरांमध्ये थंडीची तीव्रता अधिक जाणवत असून, नागरिकांनी गरम कपडे आणि सावधगिरी बाळगावी, असे आवाहन हवामान विभागाने केले आहे.
पुणे जिल्ह्यातही थंडीची लाट कायम असून, बारामती जिल्ह्यात सलग चौथ्या दिवशी पारा ७ अंशाच्या खाली नोंदविला गेला आहे. तसेच माळीण, दौंड, आंबेगाव आणि तळेगाव दाभाडे परिसरासह डोंगर भाग आणि धरणक्षेत्रात कडाक्याच्या थंडीने नागरिक चांगलेच गारठले आहेत.
आजचे तापमान
पाषाण ८.३, शिवाजीनगर ८.८, कोरेगाव पार्क १३.३, चिंचवड १४.१, वडगावशेरी १५.३, मगरपट्टा १५.६, हवेली ७.१, बारामती ७.७, माळीण ८.५, दौंड ९.३, तळेगाव ९.४, आंबेगाव १०, निमगिरी ११.२, भोर १३.१


