पिंपरी-चिंचवड : महापालिका निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर होताच राजकीय हालचालींना वेग आला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुणे आणि पिंपरी-चिंचवडमध्ये भाजप स्वबळावर लढणार असल्याची घोषणा करताच, अजित पवार गटातील निवडणूक प्रमुख नाना काटे आणि शरद पवार गटातील कोअर कमिटी सदस्य सुनील गव्हाणे यांची महत्त्वाची बैठक झाली. ही दोन्ही राष्ट्रवादी गटांची एकत्रित चर्चा पहिल्यांदाच घडली असून, भाजपला शह देण्यासाठी आघाडीच्या दृष्टीने हे महत्त्वाचे पाऊल मानले जात आहे.
नाना काटे यांनी सांगितले की, काही दिवसांपूर्वी सुप्रिया सुळे यांचा फोन आला होता. त्यांनी मतविभाजन टाळण्याचा आणि शरद पवार गटातील स्थानिक नेत्यांशी चर्चा करण्याचा सल्ला दिला. या बैठकीत अजित पवार आणि सुप्रिया सुळे यांच्यासह वरिष्ठ नेत्यांच्या आदेशानुसार चर्चा झाली. यात घड्याळ चिन्हावर लढणे की तुतारी चिन्हावर उमेदवार उभे करणे, फक्त दोन्ही राष्ट्रवादींची आघाडी की शिंदे सेनेला सोबत घेणे, अशा विविध पर्यायांवर विचारमंथन झाले. भाजपविरोधी लढाईसाठी कोणते समीकरण प्रभावी ठरेल, यावर एकमत होण्याच्या दृष्टीने ही चर्चा महत्त्वाची ठरली.
दरम्यान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले की, पुणे आणि पिंपरी-चिंचवडमध्ये अजित पवार गटाची राष्ट्रवादी आणि भाजप एकत्र लढू शकणार नाहीत. “अजितदादांशी चर्चा झाली आहे. एकत्र लढलो तर विरोधकांना फायदा होईल, हे आम्हाला दोघांनाही समजते. त्यामुळे आम्ही एकमेकांविरोधात लढू, पण ही मैत्रीपूर्ण लढत असेल,” असे फडणवीस म्हणाले. राज्यातील इतर ठिकाणी भाजप आणि शिंदे सेना एकत्र लढणार असून, महापालिका निवडणुकीत ते एकत्र दिसतील.
मतदारयादीतील घोळावर विरोधकांच्या टीकेला उत्तर देताना फडणवीस म्हणाले की, काही प्रमाणात घोळ असतोच, पण त्यामुळे निवडणुका पुढे ढकलता येणार नाहीत. येत्या काळात एसआयआर प्रक्रियेमुळे आणि ब्लॉकचेन तंत्रज्ञानामुळे हा घोळ पूर्णपणे संपेल. निवडणुकीच्या घोषणेनंतर पिंपरी-चिंचवडमध्ये राजकीय वातावरण तापले असून, दोन्ही राष्ट्रवादींच्या एकजुटीच्या चर्चेमुळे भाजपसाठी आव्हान वाढले आहे.


