Crime News: छत्रपती संभाजीनगर शहरात अत्यंत संतापजनक आणि क्रूर घटना उघडकीस आली आहे. अवघ्या सातवीच्या वर्गात शिकणाऱ्या एका अल्पवयीन मुलीला गुंगीचे औषध देऊन तिच्यावर काका आणि पुतण्याने सामूहिक बलात्कार केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. या नराधमांनी केवळ अत्याचार केला नाही, तर पीडितेचे आक्षेपार्ह व्हिडिओ बनवून तिच्या नातेवाईकांना पाठवले आणि ते सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी देत लाखो रुपयांची खंडणी मागितली. या प्रकरणी पोलिसांनी कृष्णा सोळुंके आणि किशोर सोळुंके या आरोपी काका-पुतण्याला बेड्या ठोकल्या आहेत.
पीडित मुलगी आणि आरोपी एकमेकांना आधीपासूनच ओळखत होते. याच ओळखीचा गैरफायदा घेत नराधमांनी तिला एका खोलीवर नेले. तिथे तिला अन्नातून किंवा शीतपेयातून नशेचे औषध देण्यात आले. मुलगी शुद्ध हरपून पडल्यानंतर दोघांनी तिच्यावर आळीपाळीने पाशवी अत्याचार केला. या कृत्यादरम्यान त्यांनी मोबाईलमध्ये तिचे नग्न व्हिडिओ आणि फोटो रेकॉर्ड केले. त्यानंतर हे व्हिडिओ मुलीच्या आत्याच्या व्हॉट्सॲपवर पाठवून, “जर पैसे दिले नाहीत, तर व्हिडिओ इंटरनेटवर टाकून कुटुंबाची नाचक्की करू,” अशी धमकी देत खंडणी वसुलीसाठी दबाव टाकण्यास सुरुवात केली. या प्रकारामुळे पीडितेचे कुटुंबीय प्रचंड दहशतीखाली आले होते.
मद्यधुंद अवस्थेत आरोपी अटक
दरम्यान, पीडितेच्या नातेवाईकांनी तात्काळ जवाहरनगर पोलीस ठाण्यात धाव घेऊन या घटनेची तक्रार दिली. प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस निरीक्षक सचिन कुंभार यांनी तपासासाठी विशेष पथक तैनात केले. पोलीस अंमलदार मारोती गोरे यांनी तांत्रिक विश्लेषण आणि मोबाईल लोकेशनच्या मदतीने आरोपींचा माग काढला. टीव्ही सेंटर परिसरातील एका बारमध्ये हे दोन्ही आरोपी मद्यधुंद अवस्थेत बसले असताना पोलिसांनी त्यांना रंगेहात अटक केली.


