Yerwada Jail Murder: राज्यातील सर्वाधिक सुरक्षित समजल्या जाणाऱ्या पुण्याच्या येरवडा मध्यवर्ती कारागृहातून एक धक्कादायक आणि कायदा सुव्यवस्थेचे वाभाडे काढणारी घटना समोर आली आहे. कारागृहामध्ये कैद्यांमध्ये झालेल्या भीषण हाणामारीत एका आरोपीचा मृत्यू झाला आहे. विशाल कांबळे असे मृत पावलेल्या कैद्याचे नाव असून, या घटनेमुळे कारागृह प्रशासनाच्या सुरक्षेतील गंभीर त्रुटी पुन्हा एकदा चव्हाट्यावर आल्या आहेत.
बराक क्रमांक १ मध्ये घडला थरार
मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना १५ डिसेंबर रोजी सकाळी ७ च्या सुमारास घडली. कारागृहातील बराक क्रमांक १ मध्ये विशाल कांबळे आणि इतर काही कैद्यांमध्ये किरकोळ कारणावरून बाचाबाची झाली. वादाचे रूपांतर पाहता पाहता तुंबळ हाणामारीत झाले. यावेळी तिथे असलेल्या आकाश चंडालिया आणि दीपक रेड्डी या दोन आरोपींनी हिंसक पवित्रा घेतला. संतापलेल्या या दोघांनी विशालवर अमानुष हल्ला चढवला.
फरशीने केले वार
हल्ल्यादरम्यान आरोपींनी केवळ हातापायांनी मारहाण न करता, तिथे पडलेल्या फरशीच्या तुकड्यांचा शस्त्र म्हणून वापर केला. आकाश आणि दीपक यांनी विशालच्या डोक्यावर आणि कंबरेवर फरशीने सपासप वार केले. डोक्याला गंभीर इजा झाल्यामुळे विशाल रक्ताच्या थारोळ्यात पडला. कारागृह रक्षकांनी तातडीने धाव घेत वाद मिटवला आणि गंभीर जखमी विशालला पुण्यातील ससून रुग्णालयात उपचारासाठी हलवले.
हेही वाचा – पुण्यात शरद पवार गटाला मोठा धक्का! ‘या’ विश्वासू शिलेदाराचा राजकारणातून संन्यास
ससूनमध्ये मृत्यूशी झुंज अपयशी
गेल्या चार दिवसांपासून विशाल कांबळेवर ससून रुग्णालयातील अतिदक्षता विभागात उपचार सुरू होते. मात्र, डोक्याला झालेली जखम अत्यंत खोल असल्याने उपचारादरम्यान त्याची प्राणज्योत मालवली. या घटनेची दखल घेत पोलिसांनी आकाश चंडालिया आणि दीपक रेड्डी यांच्याविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल केला आहे.
सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर
कारागृहासारख्या संवेदनशील ठिकाणी सुरक्षारक्षकांच्या उपस्थितीत एवढा मोठा हल्ला कसा होतो, असे प्रश्न आता उपस्थित केले जात आहेत. येरवडा कारागृहात गेल्या काही महिन्यांपासून कैद्यांमधील टोळीयुद्ध आणि वादाच्या घटना वाढल्या असून, या ताज्या खुनाच्या प्रकरणामुळे कारागृह प्रशासनाच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.


