Pune Politics: राज्यातील २९ महानगरपालिकांच्या निवडणुकीचा बिगुल वाजलेला असतानाच, पुणे राजकारणातून एक अत्यंत धक्कादायक बातमी समोर आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि सलग तीन वेळा नगरसेवक राहिलेले विशाल तांबे यांनी सक्रिय राजकारणातून निवृत्ती जाहीर केली आहे. ‘जरा विसावू या वळणावर’ या शीर्षकाखाली सोशल मीडियावर एक भावूक पोस्ट लिहित त्यांनी आपल्या १९ वर्षांच्या राजकीय प्रवासाला पूर्णविराम दिला आहे.
पक्षनिष्ठेचा वारसा, पण थांबण्याचा निर्णय
विशाल तांबे हे शरद पवार आणि सुप्रिया सुळे यांचे अत्यंत निकटवर्तीय मानले जातात. २००७, २०१२ आणि २०१७ अशा सलग तीन निवडणुकांमध्ये त्यांनी धनकवडी परिसरातून विजय मिळवला होता. पुणे महानगरपालिकेचे स्थायी समिती अध्यक्षपद भूषवलेल्या तांबे यांनी अचानक घेतलेल्या या निर्णयामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.
निवृत्तीमागची भूमिका
मी कोणत्याही पक्षावर नाराज नाही, पण आता थांबण्याची वेळ आली आहे, असे तांबे यांनी स्पष्ट केले. दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसने एकत्र यावे, अशी भूमिका त्यांनी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांच्याकडे आधीच मांडली होती. आगामी महानगरपालिका निवडणुकीत ते उमेदवार किंवा सक्रिय भूमिकेत दिसणार नाहीत.
‘धनकवडी हे माझं कुटुंब’; पोस्टमधून व्यक्त केली कृतज्ञता
विशाल तांबे यांनी आपल्या सोशल मीडिया पोस्टमध्ये धनकवडीतील नागरिकांशी संवाद साधताना म्हटले की, ‘गेल्या ३० वर्षांपासून मी या परिसराशी जोडला गेलो आहे. विद्यार्थी दशेपासून जनसेवेची उर्मी मनात होती. तुम्ही मला भरभरून प्रेम दिले, तुमच्या ऋणातून मला मुक्त व्हायचे नाही, तर ते ऋणानुबंध मनात साठवायचे आहेत.’


