Ravindra Dhangekar: राज्यातील महानगरपालिका निवडणुकांची तयारी मोठ्या प्रमाणावर सुरू आहे. राजकीय पक्षांनी निवडणुकीच्या अनुषंगाने हालाचाली सुरू केल्या आहेत. अशातच महायुतीत मित्रपक्ष शिवसेना आणि भाजपची पुणे विभागासाठी एक बैठक पार पडली. या बैठकीआधी शिवसेनेचे नेते रविंद्र धंगेकर 165 जागांवर उमेदवार देण्यासाठी ठाम होते. तर, शहरप्रमुख नाना भानगिरे महायुतीसोबत युती करण्यावर ठाम होते आणि त्यांनी भाजपकडे 35 ते 40 जागा हव्या असल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे पुण्यातील शिवसेनेत ताळमेळ नसल्याच समोर आलं आहे.
उदय सामंत यांची रात्री उशिरा धंगेकरांनी भेट घेतली
शिवसेना शिंदे गटाचे नेते आणि राज्याचे उद्योग मंत्री उदय सामंत यांच्या उपस्थितीत रात्री पुण्यातील शिवसेना पदाधिकाऱ्यांची बैठक पार पडली. येत्या तीन-चार दिवसात जागा वाटपाबाबत निर्णय होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. काल दुपारच्या बैठकीला रवींद्र धंगेकर उपस्थित होते. मात्र उदय सामंत यांची रात्री उशिरा धंगेकरांनी भेट घेतली. पुणे महापालिकेत भाजप आणि शिवसेना एकत्र निवडणूक लढणार आहेत.
पुणे महापालिकेत भाजपचा किमान 125 जागा जिंकण्याचा दावा
मिळालेल्या माहितीनुसार, भाजपच्या स्थानिक नेत्यांकडून पुणे महापालिकेत किमान 125 जागा जिंकण्याचा दावा करण्यात येत आहे. या सर्व घडामोडींच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुणे दौऱ्यात भाजप आणि शिवसेना एकत्र निवडणूक लढवणार असल्याची अधिकृत घोषणा केल्यानंतर जागावाटपाबाबत हालचालींना वेग आला आहे.
मराठी वृत्तसंस्थेने सूत्रांच्या हवाल्याने दिलेल्या माहितीनुसार भाजपकडे सध्या 105 माजी नगरसेवकांचे संख्याबळ आहे. गेल्या वेळी दुसऱ्या स्थानावर राहिलेल्या उमेदवारांना भाजप संधी देणार असल्याची माहिती आहे. त्यामुळे भाजप 125 जागा निवडून आणण्यासाठी चांगले प्रयत्न करणार आहे. 125 व्यतिरिक्त जागांवरच महायुतीच्या वाटाघाटी होणार असल्याचे स्पष्ट संकेत देण्यात आले आहेत. भाजपने मागील निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसने जिंकलेल्या सुमारे 50 जागांवर लक्ष केंद्रित केले असून त्या ठिकाणी तगडे उमेदवार देण्यासाठी चाचपणी सुरू आहे.


