Satej Patil vs Mahayuti: कोल्हापूर महानगरपालिकेच्या सत्तेचा तिढा सोडवण्यासाठी महायुतीने आता कंबर कसली आहे. भाजप, शिवसेना (शिंदे गट) आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) यांनी ही निवडणूक एकत्रित लढण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतला आहे. आमदार सतेज पाटील यांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडीला शह देण्यासाठी महायुतीच्या दिग्गज नेत्यांनी एकत्र येत विजयाची ‘ब्लूप्रिंट’ तयार केली आहे.
प्रमुख नेत्यांची खलबतं आणि बंडखोरीवर ‘वॉच’
पालकमंत्री प्रकाश आबिटकर, मंत्री हसन मुश्रीफ, राज्य नियोजन मंडळाचे कार्याध्यक्ष राजेश क्षीरसागर आणि भाजप आमदार अमल महाडिक यांच्यात एक महत्त्वाची संयुक्त बैठक पार पडली. या बैठकीतील निर्णयानुसार, सक्षम उमेदवार शोधण्यासाठी तिन्ही पक्षांच्या प्रमुखांची एक विशेष उपसमिती स्थापन केली जाणार आहे. तिकीट वाटपानंतर होणारी संभाव्य बंडखोरी रोखण्यासाठी तिन्ही पक्षांनी एकमेकांच्या संपर्कात राहून रणनीती आखण्याचे निश्चित केले आहे.
जागावाटपाचा संभाव्य ‘कोल्हापुरी’ फॉर्म्युला
कोल्हापूर मनपाच्या ८१ जागांसाठी स्थानिक पातळीवर जागावाटपाची प्राथमिक चर्चा झाली असून, वरिष्ठ नेत्यांच्या शिक्कामोर्तबाची प्रतीक्षा आहे. महायुतीच्या फॉर्म्यूल्यानुसार, भाजप ३३ जागा, शिवसेना (शिंदे गट) ३३ जागा, राष्ट्रवादी काँग्रेस १५ जागावर लढणार असल्याचं सांगण्यात येत आहे. दरम्यान, निवडणुकीपूर्वीच महायुतीने ‘इनकमिंग’ सुरू केले आहे. माजी महापौर सई खराडे यांनी आपल्या मुलासह शिवसेना शिंदे गटात प्रवेश केल्याने काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे. शिवसेनेने अनेक माजी नगरसेवकांना आपल्या गळाला लावल्याने महाविकास आघाडीसमोर मोठे आव्हान उभे राहिले आहे.


