Pune Municipal Council Election: पुणे जिल्ह्यातील पाच महत्त्वाच्या नगरपरिषदांच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी प्रशासनाने कंबर कसली आहे. येत्या 20 डिसेंबर रोजी होणाऱ्या मतदानासाठी मतदारांना आपला हक्क बजावता यावा, यासाठी संपूर्ण मतदारसंघात सार्वजनिक सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी जितेंद्र डुडी यांनी यासंदर्भातील अधिकृत आदेश प्रसिद्ध केले आहेत.
‘या’ नगरपरिषदांमध्ये असेल सुट्टी
प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, खालील पाच शहरांच्या कार्यक्षेत्रात सुट्टी लागू असेल: १. बारामती २. दौंड ३. लोणावळा ४. तळेगाव दाभाडे ५. फुरसुंगी-उरुळी देवाची
हेही वाचा – पुणे महानगरपालिका निवडणुकीत दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार? शरद पवारांची स्पष्ट भूमिका
बँका, सरकारी कार्यालये आणि खासगी संस्थांनाही आदेश
मतदान प्रक्रियेत नागरिकांचा सहभाग वाढवण्यासाठी ही सुट्टी व्यापक स्वरूपात लागू करण्यात आली आहे. सर्व राज्य व केंद्र सरकारी कार्यालये, महामंडळे आणि मंडळांना सुट्टी अनिवार्य असेल. तसेच सर्व सार्वजनिक उपक्रम आणि बँकांनाही २० डिसेंबर रोजी सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. जे मतदार या मतदारसंघातील रहिवासी आहेत, मात्र कामानिमित्त बाहेर आहेत, त्यांनाही मतदानासाठी ही सुट्टी लागू राहील.
जिल्हाधिकाऱ्यांचे आवाहन
निवडणूक प्रक्रियेत पारदर्शकता आणि लोकशाहीचा उत्साह टिकवून ठेवण्यासाठी जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी सर्व मतदारांना आपला मतदानाचा हक्क न विसरता बजावण्याचे आवाहन केले आहे. संबंधित विभागांनी सुट्टीबाबतच्या सूचनांचे काटेकोर पालन करावे, असेही आदेशात नमूद करण्यात आले आहे.


