Khashaba Jadhav : स्वतंत्र भारताला पहिले वैयक्तिक ऑलिम्पिक पदक जिंकून देणारे ‘पॉकेट डायनॅमो’ पैलवान खाशाबा दादासाहेब जाधव यांच्या मरणोत्तर ‘पद्मविभूषण’ पुरस्काराचा मार्ग अखेर मोकळा झाला आहे. मुंबई उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर सर्किट बेंचने याप्रकरणी केंद्र सरकारला मोठा दणका दिला असून, येत्या ४ मे पूर्वी या पुरस्काराबाबत सकारात्मक निर्णय घेण्याचे स्पष्ट निर्देश दिले आहेत. न्यायालयाच्या या निर्णयामुळे मागील ७४ वर्षांपासूनची प्रतीक्षा आता संपण्याची चिन्हे आहेत.
न्यायालयाने ओढले सरकारवर ताशेरे
‘कुस्तीवीर खाशाबा जाधव फाउंडेशन’ने नोव्हेंबर २०२५ मध्ये दाखल केलेल्या याचिकेवर सुनावणी करताना न्यायालयाने सरकारी यंत्रणेच्या वेळकाढू धोरणावर तीव्र नाराजी व्यक्त केली. खाशाबा जाधवांसारख्या जागतिक दर्जाच्या खेळाडूचा सन्मान इतकी वर्षे रखडणे खेदजनक असल्याचे निरीक्षण न्यायालयाने नोंदवले. ४ मे २०२६ ही अंतिम मुदत देत केंद्र सरकारला यावर ठोस भूमिका घेण्यास बजावले आहे.
पुत्र रणजित जाधव यांच्या संघर्षाला यश
आपल्या वडिलांना योग्य सन्मान मिळावा यासाठी खाशाबांचे सुपुत्र रणजित जाधव यांनी मोठा कायदेशीर लढा दिला आहे. २०१७ मध्ये या पुरस्काराची फाईल गहाळ झाल्याचा प्रकार उघडकीस आला होता. राज्य सरकारने आश्वासन देऊनही केंद्राकडे पाठपुरावा न झाल्याने अखेर जाधव कुटुंबाला न्यायालयाचे दार ठोठावावे लागले होते. आजच्या निर्णयामुळे त्यांच्या या संघर्षाला मोठे यश मिळाले आहे.
खाशाबा जाधव: ७४ वर्षांपूर्वीचा तो ऐतिहासिक पराक्रम
सातारा जिल्ह्यातील गोलेश्वर या छोट्याशा गावात जन्मलेल्या खाशाबांनी प्रतिकूल परिस्थितीत जागतिक कुस्तीत भारताचा तिरंगा फडकावला. १९५२ च्या हेलसिंकी ऑलिम्पिकमध्ये त्यांनी जर्मनी, कॅनडा आणि मेक्सिकोच्या मल्लांना धूळ चारत कांस्यपदक पटकावले होते. हे स्वतंत्र भारताचे पहिले वैयक्तिक ऑलिम्पिक पदक होते. विशेष म्हणजे, ऑलिम्पिकला जाण्यासाठी त्यांच्याकडे पैसे नसताना ग्रामस्थांनी वर्गणी जमा करून त्यांना मदत केली होती. १४ ऑगस्ट १९८४ रोजी निधन झालेल्या या महान खेळाडूचा ७४ वर्षांनंतर होणारा हा संभाव्य सन्मान संपूर्ण क्रीडाविश्वासाठी अभिमानास्पद ठरणार आहे.


