BMC Election : मुंबई महापालिका (BMC) निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर चेंबूर परिसरातून एक वादग्रस्त आरोप समोर आला आहे. शिवसेना (शिंदे गट) नेते आणि माजी खासदार राहुल शेवाळे यांच्या पत्नी कामिनी शेवाळे यांनी प्रभाग क्रमांक १४२ मध्ये महिलांना महागड्या साड्या वाटप केल्याचा दावा स्थानिकांनी केला आहे. या साड्या मतदारांना आकर्षित करण्यासाठी वाटल्या गेल्या असून, याला महिलांनी तीव्र विरोध दर्शवला. काही महिलांनी या साड्या जाळून आपला संताप व्यक्त केला.
हा प्रकार उघडकीस आल्यानंतर ठाकरे गटाच्या शिवसेनेने याची कडवी टीका केली. “निवडणुका जाहीर झाल्यानंतरही साड्या वाटप करणे हा आचारसंहितेचा भंग आहे,” असा आक्षेप घेत ठाकरे सेनेने निवडणूक आयोगाकडे तक्रार नोंदवली. “कामिनी शेवाळे जिंकण्यासाठी केविलवाणी धडपड करत आहेत. चेंबूरमध्ये मशाल पेटणारच,” असा टोला ठाकरे सेनेकडून लगावला गेला.
महायुतीत जागावाटप अंतिम टप्प्यात
मुंबई महापालिकेच्या २२७ जागांसाठी महायुतीचे (भाजपा-शिंदे सेना-अजित पवार गट) जागावाटप अंतिम टप्प्यात आहे. पुढील दोन दिवसांत यावर शिक्कामोर्तब होईल, अशी माहिती आहे. कामिनी शेवाळे यांची प्रभाग १४२ मधून उमेदवारी निश्चित असल्याचे सांगितले जात आहे. ठाकरे बंधू एकत्र आल्याने मतांची गणिते बदलली असून, शिंदे सेनेकडून महिला मतदारांना लक्ष्य करण्यासाठी विविध प्रयत्न सुरू आहेत.
BMC निवडणुकीची घोषणा नुकतीच झाली असून, १५ जानेवारी २०२६ रोजी मतदान आणि १६ जानेवारीला निकाल जाहीर होईल. आचारसंहिता लागू झाल्यानंतर असे आरोप निवडणूक प्रक्रियेवर प्रश्नचिन्ह निर्माण करत आहेत. निवडणूक आयोग याची दखल घेईल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.


