पुणे: राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार आणि ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्यात गुरुवारी पुण्यात वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट येथे बंद दाराआड चर्चा झाली. वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटच्या सर्वसाधारण सभेच्या बैठकीत मात्र अजित पवारांनी साहेबांबरोबर बसणे बोलणे टाळले. त्यांनी व्यासपीठावरील स्वतःची नेमप्लेटची जागा बदलून त्या ठिकाणी सहकारमंत्री बाबासाहेब पाटील यांना दोघांच्यामध्ये बसण्याची विनंती केली. त्यानुसार पाटील दोघांच्या मध्ये बसले.
अर्ध्या तासानंतर साहेब आणि दादा यांच्यात किरकोळ संवाद झाला. बैठकीनंतर पवारांनी कार्यक्रमस्थळावरून बाहेर जाणे पसंत केले. मात्र अजित पवार यांनी पारितोषिके मिळालेल्या कारखान्यांच्या संचालकांबरोबर फोटोसेशन केले. त्यामुळे वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटच्या कार्यक्रमावर यावेळी प्रथमच दोन वर्षांनंतर दादांचा दबादबा दिसून आला. व्हीएसआयमधील बंद दाराआड झालेल्या चर्चेची आता राज्यभर चर्चा सुरु आहे.


