पुणे: साखरेच्या विक्री मूल्यावर घातलेला लगाम आणि वाढत्या उत्पादन खर्चामुळे देशातील कारखानदारीला केंद्र सरकारने दिलासा दिला. गेले १६ महिने बंद असलेले साखर निर्यातीचे दरवाजे उघडताना केंद्राने १० लाख मेट्रिक टन साखर निर्यातीला परवानगी दिली आहे. यामुळे मरगळलेल्या कारखानदारीला थोडा दिलासा मिळाला असला, तरी एप्रिल ते ऑगस्टपर्यंत साखरेचे दर वाढणार आहेत. त्यामुळे साखर निर्यातीची घाई करू नका, कोटा विकताना काळजी घ्या, नाही तर घाईत चुकीचा निर्णय घेणार आणि नंतर दादा मला वाचवा… असे चालणार नसल्याचे सूतोवाच राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार यांनी पुण्यात केले आहे.
तसेच गुळाची पावडर आणि गूळ तयार करण्याचे काम सुरू झाले आहे. त्यावर कोठेतरी बंधने ही आणावी लागणार असल्याचा इशारा अजित पवार यांनी दिला आहे. वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटची ४८ वी वार्षिक सर्वसाधारण सभा गुरुवारी मांजरी बु. (ता. हवेली) येथे झाली. यावेळी पवारांच्या हस्ते अनेक पुरस्काराचे वितरण करण्यात आले.
अजित पवार म्हणाले, की नेहमीच्या पद्धतीमध्ये आता बदल करावा लागणार आहे. कृषी विभाग, ऊर्जा विभाग, राज्य उत्पादन शुल्क आणि सहकार या चार विभागांच्या कामावर पुढील काळात भर दिला जाणार आहे. कारण साखरेच्या वाढत्या उत्पादन खर्चाच्या तुलनेत बाजारात भाव मिळत नाही, किंबहुना तोटा सहन करावा लागतो. यामुळे साखरेचा हमीभाव विनाविलंब वाढवण्यासाठी निर्णय घेण्याची गरज असल्याचे पवार म्हणाले.


