मुंबई: एसटी महामंडळाने उत्पन्नवाढीसाठी १५ टक्के भाडेवाढ करण्याचा प्रस्ताव राज्य सरकारला सादर केला आहे. या प्रस्तावावर गुरुवार, २३ जानेवारी रोजी मंत्रालयात राज्य परिवहन प्राधिकरणाच्या बैठकीत शिक्कामोर्तब करण्यात येणार होते. मात्र हा निर्णय एक दिवस लांबला असून शुक्रवार, २४ जानेवारी रोजी होणाऱ्या बैठकीत भाडेवाढीचा अंतिम निर्णय घेण्यात येणार असल्याची माहिती एसटी महामंडळाकडून देण्यात आली आहे.
दरम्यान, ही भाडेवाढ झाल्यानंतर एसटीचा प्रवास साधारण ६० रुपयांनी महागणार आहे. एसटीची दिवाळीतील हंगामी भाडेवाढ राज्य सरकारने रद्द केली होती, परंतु वाढता तोटा पाहता महामंडळान राज्य सरकारला १५ टक्के भाडेवाढीचा प्रस्ताव पाठवला आहे. याआधी २०२१ मध्ये भाडेवाढ करण्यात आली होती.


