नाशिक: मालेगाव शहरात बांगलादेशी, रोहिंग्यांना सर्रासपणे जन्मनोंद करून मिळत असल्याच्या तक्रारीची चौकशी करणाऱ्या विशेष तपास पथकाने आपला अहवाल शासनाला सादर केला आहे. या अहवालानंतर मालेगावचे तत्कालीन तहसीलदार नितीनकुमार देवरे यांच्यासह सध्या कार्यरत असलेले नायब तहसीलदार संदीप धारणकर यांना गुरुवारी सायंकाळी तडकाफडकी निलंबित करण्यात आले आहे. त्याचबरोबर विजय अंभोरे, लिपिक रोहन शेख आणि अव्वल कारकून भरत शेवाळे तीन कर्मचाऱ्यांनाही निलंबनाच्या कारवाईला सामोरे जावे लागले आहे.
या आदेशांमुळे महसूल प्रशासनात खळबळ उडाली आहे. मालेगाव शहरात गत महिनाभरात चार हजारांहून अधिक नागरिकांची जन्मनोंद करण्यात आली आहे. यामध्ये सर्वाधिक नागरिक बांगलादेशी असल्याचा आरोप सोमय्या यांनी केला आहे. मालेगावात ‘व्होट जिहाद’ तसेच ‘लँड जिहाद’ होत असल्याचा देखील त्यांनी दावा केला आहे.


