पुणे: टँकरच्या चाकाखाली सापडून एक वर्षाच्या बालकाचा मृत्यू झाल्याची घटना हडपसर-सासवड रस्त्यावरील उरुळी देवाची परिसरात घडली. या प्रकरणी हडपसर पोलिसांनी टँकरचालकावर गुन्हा दाखल केला.
कृष्णा राहुल महतो असे मृत्युमुखी पडलेल्या बालकाचे नाव आहे. याप्रकरणी टँकरचालक विजयकुमार बालाजी फड (वय ३२, रा. खांदवेनगर, लोहगाव) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. याबाबत बबितादेवी राहुल महतो (वय २२, सध्या रा. उरुळी देवाची, हडपसर-सासवड रस्ता, फुरसुंगी) यांनी हडपसर (काळेपडळ) पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, महातो दाम्पत्य सासवड रस्त्यावरील उरुळी देवाची परिसरातील एका भंगार माल दुकानात कामाला आहेत. दुकानाच्या पोटमाळ्यावर ते राहायला आहेत. मंगळवारी (२१ जानेवारी) दुपारी तीनच्या सुमारास महातो यांचा एक वर्षाचा मुलगा कृष्णा भंगार माल दुकानाच्या समोरील मोकळ्या जागेत खेळत होता. त्याची आई बबितादेवी यांनी त्याला चटईवर ठेवले होते. त्या वेळी तेथे आलेल्या पाण्याच्या टँकरच्या चाकाखाली तो सापडला. त्याचा जागीच मृत्यू झाला.


