करमाळा: कोळगाव धरणाच्या पाणलोट क्षेत्रात उपसा केलेल्या वाळूसह यांत्रिक बोट आणि इतर सामग्री करमाळा पोलिसांनी ताब्यात घेतली आहे. तालुक्यातील निमगाव (ह.) येथे धाराशिव जिल्ह्याच्या परंडा तालुक्यातील सोनारी येथील बोट मालकाच्या बोटीद्वारे तीन परप्रांतीयांकडून हा उपसा सुरू होता.
याबाबत पो.शि. सतीश वामन एनगुले (नेमणूक करमाळा पोलीस ठाणे) यांनी दि. १५ जानेवारी रोजी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, दि. १५ जानेवारी
रोजी पहाटे ३ वाजण्याच्या सुमारास कोळगांव धरणाच्या पाणलोट क्षेत्रात करमाळा तालुक्यातील निमगाव (ह.) येथील जलाशयातून संशयित आरोपी फैजुल माफीजुद्दीन शेख (वय-२८, रा. गुहीटोला, पो. पलाशगच्छी, आंचल-उधवा, थाना राधानगर, ता. उत्तर पलाशगच्छी, जि. साहेबगंज, राज्य झारखंड), असरफ असाराऊल शेख (वय २१, रा. दरगांडगा, ता. उधुआ, जि. साहेबगंज, झारखंड), रबुल सजल शेख (वय-२७, रा. बिकल टोला, प्लासगाछी, ता. उत्तर पलासगछी, जि. साहेबगंज, झारखंड) व बोटमालक अविनाश अभिमान हांगे (वय-३१, रा. सोनारी, ता. परंडा, जि. धाराशिव) यांनी संगनमत करून पर्यावरणाचा ऱ्हास होईल हे माहीत असताना देखील महसूल विभागाचा परवाना व रॉयल्टी नसताना कोळगाव धरणाच्या जलाशयातून बोटीने व सक्शन पाईपने वाळू काढून त्याचा साठा करून ती चोरून विक्री करण्याच्या उद्देशाने जवळ बाळगलेल्या स्थितीत मिळून आला आहे.
या कारवाईत करमाळा पोलिसांनी ३ लाख रुपये किमतीची एक यांत्रिक बोट व इतर सामुग्री, ८० हजार किमतीचा एक सक्शन पाईप, इतर सामुग्री आणि २० हजार रुपये किमतीची एकूण अंदाजे ४ ब्रास वाळू असा एकूण ४ लाख रुपये किमतीचा मुद्देमाल ताब्यात घेतला असून पोलिसांनी तहसीलदार यांच्याशी पत्रव्यवहार करून पुढील कारवाई सुरू केली आहे.


