रायगड: रायगडचे पालकमंत्रिपद राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाच्या नेत्या तथा महिला व बालविकासमंत्री अदिती तटकरे यांच्याकडे देण्यात आले होते. मात्र, त्यानंतर भरत गोगावले यांनी आपली जाहीर नाराजी बोलून दाखवली. एवढेच नाही तर त्यांच्या समर्थकांनी महामार्ग रोखत खासदार सुनील तटकरे यांच्याविरोधात घोषणाबाजी केली होती, त्यामुळे चांगलेच राजकारण तापल्याचे पाहायला मिळाले.
यानंतर अखेर राज्य सरकारने रायगड आणि नाशिक जिल्ह्याच्या पालकमंत्रिपदाच्या निवडीच्या निर्णयाला स्थगिती दिली. आता गोगावले यांनी पालकमंत्रिपद आपल्यालाच मिळावे, यासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली आहे, तर दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्रिपदाचा योग्य निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस घेतील असे स्पष्ट केले आहे.
अशातच गोगावले यांनी सुनील तटकरे यांच्यावर हल्लाबोल करत गंभीर आरोप केला आहे. खासदार तटकरे यांनी निवडणुकीत आमच्या पाठीत खंजीर खुपसला आहे. आम्ही निवडणुकीत प्रामाणिकपणे काम केले, पण त्यांनी प्रामाणिकपणे काम केले नाही, असा आरोप गोगावले यांनी सुनील तटकरे यांच्यावर केला आहे.


