महाराष्ट्र जागरण डेस्क: मराठी मनोरंजन विश्वातील लोकप्रिय अभिनेता म्हणजे सुबोध भावे. सुबोधला आपण विविध सिनेमांमधून अभिनय करताना पाहिलंय. ‘बालगंधर्व’, ‘लोकमान्य’, ‘कट्यार काळजात घुसली’, ‘आणि.. डॉ. काशीनाथ घाणेकर’ अशा विविध सिनेमांमधून सुबोधने प्रेक्षकांचं मन जिंकलंय. सुबोध भावेचा ‘संगीत मानापमान’ नुकताच प्रर्दशित झाला आहे. सुबोध भावेने एका मुलाखतीत त्याच्या ड्रीम रोलबद्दल सर्वांना सांगितलंय. सुबोधने याबद्दल खुलासा केला की, हा बायोपिक अजिबातच नाहीये. पण एक भूमिका आहे ज्याच्या संहितेवर मी गेली १५ वर्ष काम करतोय.
मला असं दिसतंय की आता ते दृष्टिक्षेपात आलंय. कदाचित पुढच्या एक-दोन महिन्यात त्याचं लिखाण संपेल. बालगंधर्व झाल्यानंतर मी त्याची संहिता करायला घेतली. खूप अवघड आहे. ती व्यक्तिरेखा करणं अवघड आहे आणि तो चित्रपट करणंही अवघड आहे. पण तरीही मला तो करायचाय आणि ते मी करणार. ते म्हणजे ययाती. ती भूमिका मला करायचीय. आता कुठे त्याला आकार मिळालाय. आणि आता वाटतंय की यावर चित्रपट होऊ शकेल. त्यामुळे हे एक स्वप्न आहे माझं जे मला पूर्ण करायचंय.
मराठी साहित्यविश्वात् ‘ययाती’ कादंबरीला एक मानाचं स्थान आहे. वि.स. खांडेकर यांनी ही कादंबरी लिहिली असून या कादंबरीला १९७४ साली साहित्यविश्वातील सर्वोच्च मानाच्या ज्ञानपीठ पुरस्काराने गौरवण्यात आले होते. ‘संगीत मानापमान’ सिनेमात सुबोधसोबत अभिनेता सुमीत राघवन, वैदेही परशुरामी, उपेंद्र लिमये, निवेदिता सराफ, नीना कुलकर्णी हे कलाकार झळकले आहेत. ‘कट्यार काळजात घुसली’ सिनेमानंतर सुबोध भावेचा दिग्दर्शक म्हणून हा दुसरा सिनेमा आहे.


