पुणे : पुणे महानगरपालिका निवडणुकीच्या रणधुमाळीत कुख्यात आंदेकर कुटुंब पुन्हा चर्चेत आले आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसकडून माजी नगरसेविका लक्ष्मी आंदेकर आणि सोनाली आंदेकर यांना उमेदवारी देण्याची तयारी सुरू असल्याचे मोठे संकेत पुणे शहराध्यक्ष सुभाष जगताप यांनी दिले आहेत. काही दिवसांपूर्वी विशेष मकोका न्यायालयाने या दोघींसह बंडू आंदेकर यांना निवडणूक लढवण्याची परवानगी दिल्यानंतर ही चर्चा तीव्र झाली आहे.
आयुष कोमकर हत्याप्रकरणात लक्ष्मी आणि सोनाली आंदेकर यांचा थेट सहभाग नाही. फक्त बंडू आंदेकरच्या घरी कट रचण्यात त्यांचा नाममात्र सहभाग असल्याचे नमूद आहे. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीच्या शहर नेतृत्वाकडून त्यांना उमेदवारी देण्याबाबत सकारात्मक चर्चा सुरू असल्याचे जगताप यांनी सूचित केले आहे. आंदेकर कुटुंबाची पुण्यातील नाना पेठ परिसरात मोठी मतपेढी असल्याने हा निर्णय राजकीयदृष्ट्या महत्त्वाचा मानला जात आहे.
मात्र, या संभाव्य उमेदवारीला आयुष कोमकरच्या कुटुंबाकडून तीव्र विरोध होत आहे. हत्याकांडातील पीडित आयुष कोमकरच्या आई संजीवनी कोमकर यांनी सोशल मीडियावर व्हिडीओ शेअर करून सर्व राजकीय पक्षांना आवाहन केले आहे. त्या म्हणाल्या, “जर आम्हाला न्याय देता येत नसेल, तरी आमच्यावर अन्याय तरी करू नका. आंदेकर कुटुंबातील कोणालाही तिकीट देऊ नका. त्यांनी माझ्या मुलाचे आयुष्य उद्ध्वस्त केले आहे.” आंदेकरांना उमेदवारी दिल्यास पक्ष कार्यालयासमोर आत्मदहन करणार असा थेट इशारा त्यांनी दिला आहे.
काय आहे प्रकरण?
गेल्या वर्षी वनराज आंदेकर यांच्या हत्येनंतर बदल्याच्या भावनेतून आंदेकर टोळीने गणेश कोमकर याचा मुलगा आयुष कोमकर (वय १९) याची नाना पेठेत गोळ्या घालून हत्या केली होती. या प्रकरणात बंडू आंदेकरसह १३ जणांवर खून आणि मकोका अंतर्गत गुन्हा दाखल आहे. बंडूचा मुलगा कृष्णा आंदेकर हत्येनंतर फरार झाला होता, मात्र वडिलांच्या वक्तव्यानंतर तो स्वतः पोलीसांसमोर हजर झाला. दरम्यान, आंदेकर कुटुंबातील महिलांना राष्ट्रवादीकडून तिकीट दिल्यास पुण्यातील राजकीय वातावरण अधिक तणावपूर्ण होण्याची शक्यता आहे.


