बीड: मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या निर्घृण हत्येप्रकरणात बीडच्या जिल्हा व विशेष सत्र न्यायालयात २३ डिसेंबर रोजी महत्त्वाची सुनावणी पार पडली. या सुनावणीत न्यायाधीशांनी सर्व आरोपींवर आरोप निश्चित केले. न्यायाधीशांनी हत्येचा संपूर्ण घटनाक्रम वाचून दाखवला आणि आरोपींना “हे आरोप तुम्हाला मान्य आहेत का?” असा प्रश्न विचारला. यावर मुख्य आरोपी वाल्मिक कराडसह सर्व आरोपींनी आरोप मान्य नसल्याचे स्पष्ट केले. विशेष म्हणजे, वाल्मिक कराड यांनी पहिल्यांदाच न्यायालयात स्वतःहून बोलत आरोप फेटाळले.
या प्रकरणातील २३वी सुनावणी होती. मागील सुनावणीत आरोपी विष्णू चाटे यांच्या जामीन अर्जावर युक्तिवाद झाला होता. तसेच, हत्येचे व्हिडीओ आरोपींच्या वकिलांना देण्यात आल्यानंतर आज आरोप निश्चित करण्यात आले. खंडणीला अडथळा आणल्याने संतोष देशमुख यांचा खून केल्याचा ठपका आरोपींवर ठेवण्यात आला आहे.
विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी सुनावणीनंतर माध्यमांना सांगितले की, “आज आरोप निश्चित करण्यात आले आहेत. खंडणी मिळण्यास अडथळा आणला म्हणून हा खून घडला. पुढील सुनावणी ८ जानेवारी रोजी होईल. आरोपींच्या वकिलांनी पुन्हा वेळकाढूपणाची रणनीती अवलंबली. न्यायालयात वारंवार तीच कारणे मांडली जात आहेत. मात्र, खटला लवकर चालवण्याचा प्रयत्न सुरू आहे आणि लवकरच प्रत्यक्ष पुराव्यांची सुनावणी सुरू होईल.”
काय आहे प्रकरण?
९ डिसेंबर २०२४ रोजी बीड जिल्ह्यातील केज तालुक्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांची आरोपींनी अपहरण करून क्रूरपणे हत्या केली. खंडणी प्रकरणात अडथळा आणल्याचा राग मनात धरून हा खून घडला. आरोपींनी टाकळी शिवारात देशमुख यांना नेले आणि बेदम मारहाण केली. मारहाणीचे १५ व्हिडीओ आणि ८ फोटो आरोपींच्या मोबाईलमध्ये सापडले, ज्यात आरोपी मारहाण करताना आणि आनंद साजरा करताना दिसतात. या क्रूर व्हिडीओ आणि फोटोंमुळे राज्यात प्रचंड संताप उसळला होता.
पोलिसांनी १८०० पानी चार्जशीट दाखल केले असून, मुख्य आरोपी वाल्मिक कराड यांच्यासह इतरांना मकोका अंतर्गत अटक करण्यात आली आहे. या प्रकरणामुळे राजकीय वादंग निर्माण झाले असून, खटला जलदगतीने चालवण्याची मागणी होत आहे. पुढील सुनावणी ८ जानेवारीला होणार असल्याने या खटल्याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.


