NCP Alliance : राज्यातील महानगरपालिका निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली असून, येत्या १५ जानेवारी रोजी होणाऱ्या मतदानासाठी आता अनपेक्षित राजकीय समीकरणे आकाराला येत आहेत. पिंपरी-चिंचवडमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटांमध्ये (शरद पवार गट आणि अजित पवार गट) युती होण्याचे संकेत मिळाले आहेत. यासंदर्भात आज पिंपरीत एक तास महत्त्वाची गुप्त बैठक पार पडली.
जागावाटपावरून खलबते
या बैठकीला शरद पवार गटाचे खासदार अमोल कोल्हे, आमदार रोहित पवार आणि अजित पवार गटाचे स्थानिक नेते अजित गव्हाणे उपस्थित होते. सुमारे तासभर चाललेल्या या चर्चेत प्रामुख्याने जागावाटपावर चर्चा झाली. काही विशिष्ट प्रभागांमध्ये दोन्ही गटांच्या इच्छुकांनी दावा केल्याने तिथे पेच निर्माण झाला आहे. तसेच महाविकास आघाडीतील इतर घटक पक्षांना सोबत घेण्याबाबतही खलबते झाली. बैठकीनंतर कोल्हे आणि रोहित पवार यांनी माध्यमांशी बोलणे टाळले आणि ते थेट पुण्याच्या दिशेने रवाना झाले. मिळालेल्या माहितीनुसार, दोन्ही गट एकत्र येण्याबाबत हे दोन नेते आज रात्री उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशी पुण्यात सविस्तर चर्चा करणार आहेत.
हेही वाचा – Sanghamitra Chaudhari : बारामतीचा पॅटर्नचं वेगळा! सर्वात तरुण नगरसेविका संघमित्रा चौधरींची हत्तीवरून मिरवणूक
ठाण्यातही राष्ट्रवादीची ‘एकी’ होण्याची शक्यता?
पिंपरी-चिंचवडप्रमाणेच ठाणे महानगरपालिकेतही दोन्ही राष्ट्रवादी गट एकत्र निवडणूक लढवण्याच्या तयारीत आहेत. अजित पवार गटाने दिलेल्या प्रस्तावावर शरद पवार गटाने सकारात्मक प्रतिसाद दिल्याची माहिती समोर येत आहे. ठाण्यातील शरद पवार गटाचे जिल्हाध्यक्ष मनोज प्रधान यांनीही या आघाडीला हिरवा कंदील दाखवल्याने, ठाण्यात नवी राजकीय युती पाहायला मिळू शकते.


