पुणे : पुणे महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीने मोठा निर्णय घेतला आहे. काँग्रेस आणि शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) एकत्रितपणे निवडणूक लढणार असून, मनसेला सोबत घेण्याबाबतही सकारात्मक चर्चा सुरू आहे.
आज दुपारी १ वाजता शिवसेना ठाकरे गटाचे पुणे जिल्हा संपर्क प्रमुख सचिन अहिर आणि काँग्रेस नेते सतेज पाटील यांची एकत्रित पत्रकार परिषद होणार असून, यात जागावाटपाचा फॉर्म्युला आणि महाविकास आघाडीची पुण्यातील पहिली उमेदवार यादी जाहीर करण्यात येणार आहे.
सूत्रांच्या माहितीनुसार, पुणे महापालिकेतील एकूण १६५ जागांपैकी काँग्रेस आणि ठाकरे सेनेला समान जागा मिळण्याची शक्यता आहे. मनसेला ठाकरे सेनेच्या कोट्यातून काही जागा देण्यावरही विचार सुरू आहे. याआधी शरद पवार गटाशी युतीच्या चर्चा फिसकटल्यानंतर महाविकास आघाडीने पुन्हा एकत्र येण्याचा निर्णय घेतला आहे.
दरम्यान, ठाकरे बंधूंच्या युतीच्या पार्श्वभूमीवर पुण्यातही मनसे-ठाकरे सेनेची स्वतंत्र युती होण्याची चर्चा होती. मात्र, आता महाविकास आघाडीच्या व्यासपीठावर मनसेला सामावून घेण्याची शक्यता बळावली आहे. ही घोषणा भाजप आणि अजित पवार गटाच्या राष्ट्रवादीसाठी मोठे आव्हान ठरू शकते.
पुणे महापालिका निवडणूक १५ जानेवारी २०२६ रोजी होणार असून, राजकीय हालचालींना वेग आला आहे. पत्रकार परिषदेकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.


