वाशिम : समृद्धी महामार्गावर वाशिम जिल्ह्यातील रिधोरा गावाजवळ केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांच्या कारला मध्यरात्री भीषण अपघात झाला. कारने समोरून येणाऱ्या ट्रकला जोरदार धडक दिली, त्यामुळे वाहनाचा पूर्ण चक्काचूर झाला. अपघातात मंत्र्यांचे अंगरक्षक निलेश वाकुडकर, चालक भूषण चोपडे आणि सहकारी वैभव देशमुख हे तिघे गंभीर जखमी झाले. सुदैवाने अपघाताच्या वेळी मंत्री प्रतापराव जाधव कारमध्ये नव्हते, त्यामुळे मोठी जीवितहानी टळली.
घटना मध्यरात्रीची असून, मंत्री जाधव यांना नागपूर विमानतळावर सोडल्यानंतर त्यांचे अंगरक्षक, चालक आणि सहकारी मेहकरच्या दिशेने परत जात होते. समोरून येणाऱ्या ट्रकने अचानक वळण घेतल्याने ही धडक झाली. अपघात इतका भीषण होता की कारचा पुढचा भाग पूर्णपणे उद्ध्वस्त झाला.
जखमींना तात्काळ वाशिममधील लाइफलाइन खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, त्यांच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत. तिघांचीही प्रकृती चिंताजनक आहे. अपघाताची माहिती मिळताच मंत्री प्रतापराव जाधव यांनी दिल्लीचा दौरा रद्द करून मुंबईमार्गे मेहकरला परतले आणि रुग्णालयात जखमींची भेट घेऊन प्रकृतीची विचारपूस केली.
महामार्ग पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन जखमींना बाहेर काढले आणि तपास सुरू केला आहे. समृद्धी महामार्गावर अपघातांच्या मालिकेने पुन्हा एकदा सुरक्षेच्या उपाययोजनांचा मुद्दा उपस्थित केला आहे.


