PMC Election: महानगरपालिका निवडणुकीच्या रणधुमाळीत उमेदवारी अर्जांच्या छाननी दरम्यान अनेक धक्कादायक बाबी समोर आल्या आहेत. मुंबईनंतर आता पिंपरी-चिंचवडमध्येही भाजप आणि शिवसेना (शिंदे गट) या दोन्ही पक्षांना मोठा धक्का बसला असून, तांत्रिक कारणामुळे त्यांच्या उमेदवारांना आता पक्षाच्या चिन्हाऐवजी ‘अपक्ष’ म्हणून मैदानात उतरावे लागणार आहे.
खासदार बारणेंच्या प्रभागात ‘स्वबळा’ची फजिती
खासदार श्रीरंग बारणे यांच्या कार्यक्षेत्रात येणाऱ्या प्रभाग २४ मध्ये भाजप आणि शिवसेना शिंदे गट परस्परांविरुद्ध लढत आहेत. मात्र, या दोन्ही पक्षांच्या उमेदवारांचे ‘एबी’ फॉर्म अर्ज भरण्याची मुदत संपल्यानंतर जमा करण्यात आले होते. विरोधी उमेदवारांनी यावर आक्षेप घेतल्याने निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी भाजपच्या ३ आणि शिंदे गटाच्या २ उमेदवारांचे ‘एबी’ फॉर्म बाद ठरवले. परिणामी, या ५ उमेदवारांना आता पक्षाचे अधिकृत चिन्ह मिळणार नसून त्यांना अपक्ष म्हणून निवडणूक लढवावी लागेल. या प्रभागात आता भाजपचा केवळ १ आणि शिंदे गटाचे २ उमेदवार अधिकृत चिन्हावर उरले आहेत.
हेही वाचा – PMC Election 2026: पुण्यात भाजपचा नवा प्रयोग! 42 विद्यमान नगरसेवकांच तिकीट कापल; नवीन चेहऱ्यांना संधी
मुंबईत दोन उमेदवारांचे अर्ज बाद
याशिवाय, मुंबईत भाजपने दोन जागांवर एकप्रकारे ‘वॉकओव्हर’ दिल्याची स्थिती निर्माण झाली आहे.
प्रभाग २११: कागदपत्रांच्या अपूर्णतेमुळे भाजप उमेदवार शकील अन्सारी यांचा अर्ज फेटाळला गेला.
प्रभाग २१२: भाजपच्या मंदाकिनी खामकर यांना केवळ १५ मिनिटांचा उशीर झाल्याने त्यांचा अर्ज स्वीकारला गेला नाही. या दोन्ही प्रभागांत आता भाजपचे अधिकृत अस्तित्व संपल्याने राजकीय चर्चांना उधाण आले आहे.
ठाकरे गटाची धाकधूक वाढली
मुंबईतील मालाड पूर्व भागातील प्रभाग ३८ ते ४२ मधील शिवसेना (ठाकरे गट) उमेदवारांच्या अर्जांवर शिंदे गटाने गंभीर आक्षेप घेतला आहे. ठाकरे गटाच्या उमेदवारांनी सादर केलेल्या ‘एबी’ फॉर्मवर डिजिटल स्वाक्षरी असल्याचा मुद्दा शिंदे गटाचे विभागप्रमुख वैभव भरडकर यांनी उपस्थित केला आहे. डिजिटल स्वाक्षरी ग्राह्य धरली जाणार की नाही, यावर ठाकरे गटाच्या ५ उमेदवारांचे भवितव्य टांगणीला लागले आहे.


