अहिल्यानगर : अहिल्यानगर महानगरपालिका निवडणुकीच्या रिंगणात उतरलेले मनसेचे दोन उमेदवार गेल्या २४ तासांपासून बेपत्ता आहेत. प्रभाग क्रमांक १७ मधील राहुल जाधव आणि अंबरनाथ भालसिंग यांचा कुटुंबीय किंवा पक्ष नेत्यांशी संपर्क झालेला नाही. या प्रकरणी अपहरणाचा संशय व्यक्त केला जात असून, मनसेने पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. पक्षाच्या जिल्हाध्यक्ष सचिन डफळ यांनी ही माहिती दिली.
डफळ म्हणाले, “केडगाव भाग हा संवेदनशील आहे. निवडणूक बिनविरोध करण्यासाठी हे अपहरण झाले असावे. कुटुंबीय आणि आम्ही काळजीत आहोत. मनसे प्रमुख राज ठाकरे हे पोलिस प्रशासनाशी संपर्कात आहेत. ही मनसे आहे, जर अंगावर याल तर शिंगावर घेऊ.” विद्यार्थी सेनेचे जिल्हाध्यक्ष सुमित वर्मा यांनीही अपहरणाचा संशय व्यक्त केला. गेल्या २-३ दिवसांपासून उमेदवारांना दमदाटी आणि निवडणूक न लढवण्याचे संदेश येत असल्याचा दावा मनसेने केला आहे.
अहिल्यानगर महापालिकेत एकूण ६८ जागा असून, उमेदवारी अर्ज माघारीची प्रक्रिया सुरू आहे. एकूण ४७७ अर्जांपैकी २८ अर्ज माघारी घेतले गेले असून, ४४९ उमेदवार रिंगणात आहेत. राजकारणात राष्ट्रवादी आणि शिवसेनेतील फुटीमुळे समीकरणे बदलली असून, महायुती आणि महाविकास आघाडीमध्ये चुरस आहे.
या घटनेमुळे अहिल्यानगरच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे. पोलिस तपास सुरू असून, उमेदवारांचा लवकरच शोध लागेल, अशी अपेक्षा आहे. १५ जानेवारीला मतदान असून, या प्रकरणाचा निवडणुकीवर परिणाम होण्याची शक्यता आहे.


