आपण निरोगी राहावं असं सर्वांनाच वाटत असतं. त्यात किडनीच्या समस्या दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे. ही समस्या केवळ वृद्धांनाच नाहीतर तरुणांनाही सतावू शकते. तरुणांमध्येही किडनीच्या गंभीर आजारांची नोंद होत आहे. ४० वर्षांच्या वयापर्यंत अनेक लोक किडनी निकामी होण्याचा त्रास सहन करत आहेत.
देशात क्रॉनिक किडनी डिसीज (CKD) चे प्रमाण जास्त असूनही, जनजागृती कमी आहे, ज्यामुळे वेळेत या आजाराचे निदान होत नाही. उच्च रक्तातील साखर थेट किडनीला नुकसान पोहोचवते. बरेच लोक वर्षानुवर्षे प्री-डायबेटिक राहतात आणि त्यांना ते कळत नाही. लक्षणे दिसू लागताच त्यांच्या किडनी ८० टक्के खराब झालेल्या असतात. मधुमेह हे किडनी निकामी होण्याचे प्रमुख कारण आहे. तसेच डोकेदुखी, शरीरदुखी किंवा हँगओव्हरसाठी लोक अनेकदा विचार न करता पेनकिलर (जसे की पॅरासिटामॉल, आयबुप्रोफेन) घेतात. या औषधांचा दीर्घकाळ वापर केल्याने किडनीचे गंभीर नुकसान होऊ शकते.
तसेच जिममध्ये जाणारे लोक अनेकदा प्री-वर्कआउट ड्रिंक्स, एनर्जी ड्रिंक्स आणि अनियंत्रित सप्लिमेंट्स घेतात. यातील काही घटक किडनीसाठी विषारी असू शकतात. म्हणून, प्रथम तपासणी न करता सप्लिमेंट्स घेतल्याने, तुमच्या किडनीचे नुकसान होण्याचा धोका असतो.


