Amaravati Politics : राज्यातील २९ महानगरपालिकांच्या निवडणुकीच्या रणधुमाळीत अमरावतीत मोठी राजकीय घडामोड घडली आहे. मतदानाला अवघे तीन दिवस शिल्लक असतानाच भाजपने कठोर पाऊल उचलत अमरावती शहरातील १५ पदाधिकाऱ्यांवर तडकाफडकी निलंबनाची कारवाई केली आहे. या कारवाईमुळे राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे.
अमरावती महानगरपालिका निवडणुकीदरम्यान पक्षशिस्त भंग आणि पक्षविरोधी कारवायांचे आरोप ठेवत भाजपचे शहराध्यक्ष डॉ. नितीन धांडे यांनी ही कारवाई केली आहे. निलंबित पदाधिकाऱ्यांवर अधिकृत भाजप उमेदवारांविरोधात उघड बंडखोरी, पक्षाच्या निर्णयांना विरोध आणि अपप्रचार केल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे.
या पदाधिकाऱ्यांच्या कृतीमुळे पक्षाची प्रतिमा मलिन होत असून संघटनात्मक शिस्त धोक्यात आल्याचे स्पष्ट झाल्यानंतर त्यांना पदांवरून तसेच प्राथमिक सदस्यत्वावरून तात्काळ निलंबित करण्यात आले आहे. भाजप पक्षात शिस्त अत्यंत महत्त्वाची असून पक्षविरोधी कारवाया कोणत्याही परिस्थितीत खपवून घेतल्या जाणार नाहीत, असा स्पष्ट संदेश या कारवाईतून देण्यात आला आहे.
दरम्यान, येत्या काही दिवसांत आणखी काही पदाधिकाऱ्यांवरही अशीच कठोर कारवाई होण्याची शक्यता असल्याची माहिती शहराध्यक्ष डॉ. नितीन धांडे यांनी दिली आहे. मतदानापूर्वी भाजपने उचललेल्या या पावलामुळे अमरावतीतील राजकारण चांगलेच तापले आहे.


