तुळजापूर : मकर संक्रांतीच्या पार्श्वभूमीवर तुळजापूर येथील तुळजाभवानी मंदिरात आज सायंकाळी ५ ते ६ या वेळेत पुरुष भाविकांना मंदिरात प्रवेशास बंदी घालण्यात आली आहे. मकर संक्रांतीच्या दिवशी देवीला ओवस भरण्याची पारंपरिक प्रथा असल्याने स्थानिक महिला आणि सुवासिनी मोठ्या संख्येने मंदिरात येतात. या धार्मिक विधी महिला भाविकांना शांततेत व सुरक्षित वातावरणात पार पाडता यावेत, यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.
या एक तासाच्या कालावधीत केवळ स्थानिक महिला व सुवासिनींनाच दर्शनाची परवानगी देण्यात येणार असून, त्यांच्यासाठी आधार कार्ड दाखवणे अनिवार्य करण्यात आले आहे. ओळख पटवणे, गर्दी नियंत्रणात ठेवणे आणि अनावश्यक गैरसमज टाळण्यासाठी ही अट लागू करण्यात आली असल्याचे मंदिर संस्थानच्या वतीने स्पष्ट करण्यात आले आहे.
दरम्यान, मकर संक्रांतीनिमित्त तुळजाभवानी मंदिरात राज्यभरातून भाविकांची मोठी गर्दी होत आहे. संभाव्य गर्दी लक्षात घेऊन दर्शन व्यवस्था सुरळीत राहावी, तसेच कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी यासाठी मंदिर संस्थान, पोलीस प्रशासन आणि स्वयंसेवकांकडून विशेष नियोजन करण्यात आले आहे.
भाविकांनी मंदिर प्रशासनाच्या सूचनांचे पालन करावे, सहकार्य करावे आणि दर्शनासाठी येताना आवश्यक ओळखपत्रे सोबत ठेवावीत, असे आवाहन मंदिर संस्थानकडून करण्यात आले आहे.


