पुणे : सिंचन घोटाळ्यामुळे सातत्याने चर्चेत असलेले राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुन्हा एकदा खळबळजनक वक्तव्य केले आहे. पुण्यातील एका प्रचारसभेत बोलताना त्यांनी १९९९ सालातील पुरंदर उपसा सिंचन योजनेबाबत गंभीर आरोप केले. “ती फाईल उघडली असती तर राज्यात हाहाकार माजला असता,” असे म्हणत त्यांनी जुन्या सरकारमधील कथित भ्रष्टाचाराचा पर्दाफाश केला.
अजित पवार म्हणाले की, १९९९ साली काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसचे सरकार सत्तेत आल्यानंतर जलसंपदा खाते त्यांच्याकडे होते. त्यावेळी पुरंदर उपसा सिंचन योजनेची फाईल त्यांच्या टेबलावर आली. फाईलमध्ये प्रकल्पाची किंमत तब्बल ३१० कोटी रुपये दाखवण्यात आली होती. मात्र, प्रत्यक्षात या प्रकल्पाचा खर्च फक्त २०० कोटी रुपये असल्याचे संबंधित अधिकाऱ्याने कबूल केल्याचा दावा त्यांनी केला.
पवारांच्या म्हणण्यानुसार, त्याआधीच्या भाजप-शिवसेना युती सरकारच्या काळात “पार्टी फंडा”साठी प्रकल्पाच्या किमतीत १०० कोटी रुपयांची वाढ करण्यात आली. याशिवाय, काही अधिकाऱ्यांनी स्वतःचे १० कोटी रुपये जोडून २०० कोटींचा प्रकल्प ३१० कोटी रुपयांचा केल्याचा आरोपही त्यांनी केला.
“ती फाईल आजही माझ्याकडे आहे. त्यावर सह्या आहेत आणि ठोस पुरावे आहेत. ती जर बाहेर काढली असती तर मोठा गदारोळ उडाला असता,” असे अजित पवार यांनी स्पष्टपणे सांगितले. त्यांच्या या दाव्यामुळे सिंचन घोटाळ्याचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला असून, राज्याच्या राजकारणात नव्या चर्चांना उधाण आले आहे.


