नागपूर : ऐन निवडणुकीच्या तोंडावर नागपूरच्या प्रभाग 14 मधील गिट्टीखडान परिसरात राजकीय वातावरण तापले आहे. येथील झोपडपट्टी भागात “काँग्रेसने धोका दिला, लाडकी बहिणींचा हप्ता थांबवायला लावला” असा आशय असलेली पत्रके काही अज्ञात व्यक्तींनी घरांसमोर ठेवली. काँग्रेस कार्यकर्त्यांनी त्यांना रोखण्याचा प्रयत्न करताच संबंधित व्यक्ती पळून गेल्याचा आरोप करण्यात आला आहे.
या प्रकरणी काँग्रेसने पोलीस ठाण्यात लेखी तक्रार दाखल केली असून, भाजपच्या प्रभाग 14 मधील उमेदवार प्रगती पाटील यांचे पती अजय पाटील यांचे सहकारी हे कृत्य करत असल्याचा आरोप काँग्रेस उमेदवार अभिजीत झा यांनी केला आहे. विशेष म्हणजे, काही घरांसमोर पत्रके ठेवताना अज्ञात व्यक्ती सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाल्याचेही समोर आले आहे. या घटनेची गंभीर दखल घेऊन पोलिसांनी व राज्य निवडणूक आयोगाने योग्य कारवाई करावी, अशी मागणी अभिजीत झा यांनी केली आहे.
दरम्यान, ‘लाडकी बहिण’ योजनेच्या लाभावरून आधीच राजकीय वाद सुरू आहे. मकर संक्रांतीपूर्वी डिसेंबर व जानेवारी महिन्यांचे मिळून 3 हजार रुपये खात्यात जमा होणार असल्याच्या बातम्यांनंतर राज्य निवडणूक आयोगाकडे तक्रारी दाखल झाल्या होत्या. काँग्रेसनेही या संदर्भात आचारसंहितेचा भंग होत असल्याचा मुद्दा उपस्थित केला होता.
राज्य निवडणूक आयोगाने स्पष्ट केले की, आचारसंहिता लागू होण्यापूर्वी सुरू झालेल्या योजनांचा नियमित लाभ देता येईल; मात्र आगाऊ स्वरूपात लाभ देणे किंवा नवीन लाभार्थी निवडणे शक्य नाही. त्यानुसार, 3 हजार रुपयांऐवजी 1500 रुपयेच लाभार्थी महिलांच्या खात्यात जमा करण्यास परवानगी देण्यात आली. मतदानाच्या अवघ्या दोन दिवस आधी ही रक्कम जमा होण्यास सुरुवात झाल्याने नागपुरात या निर्णयाचे पडसाद उमटताना दिसत आहेत.
राज्यातील 29 महानगरपालिकांसाठी 15 जानेवारी रोजी मतदान होणार आहे. त्याआधी काही महायुती उमेदवारांकडून सोशल मीडियावर 14 जानेवारीपूर्वी 3 हजार रुपये जमा होणार असल्याचे दावे करण्यात आले होते. त्यामुळे मकर संक्रांतीच्या दिवशी निधी वितरण आचारसंहितेचा भंग ठरत नाही का, असा सवाल काँग्रेसकडून उपस्थित करण्यात आला आहे.


