PMC Election: पुणे आणि पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या रणधुमाळीत मतदानाला अवघे काही तास उरले असतानाच, मतदारांना प्रलोभने दाखवण्याचे धक्कादायक प्रकार उघडकीस आले आहेत. पुण्यात चांदीच्या वाट्यांचे वाटप झाल्याचा आरोप होत असतानाच, पिंपरी-चिंचवडमध्ये चक्क वॉशिंग मशीनने भरलेला ट्रक निवडणूक आयोगाच्या पथकाने जप्त केला आहे.
पुण्यात मध्यरात्री काय घडलं?
पुणे महापालिकेच्या प्रभाग क्रमांक ४० (ड) मध्ये बुधवारी रात्री प्रचंड हायव्होल्टेज ड्रामा पाहायला मिळाला. ठाकरे गटाचे नेते वसंत मोरे यांनी विरोधी उमेदवारावर गंभीर आरोप केले आहेत. रात्रीच्या अंधारात मतदारांना आकर्षित करण्यासाठी चांदीच्या वाट्यांचे वाटप केले जात असल्याचा दावा मोरे यांनी केला आहे. एका संशयास्पद गाडीची झडती घेतली असता, त्यामध्ये चांदीच्या वस्तूंसह राष्ट्रवादी काँग्रेसचे (अजित पवार गट) उमेदवार प्रकाश कदम यांच्या प्रचाराच्या पत्रिका आणि मतदारांच्या याद्या आढळल्याचे त्यांनी सांगितले. वसंत मोरे यांचा मुलगा रुपेश मोरे या प्रभागातून निवडणूक लढवत असून, या प्रकाराबाबत त्यांनी पोलिसांत अधिकृत तक्रार नोंदवली आहे.
पिंपरीत वॉशिंग मशीन वाटण्याचा प्लॅन फेल
दुसरीकडे, पिंपरी-चिंचवडमध्ये आचारसंहितेचा भंग करणारी मोठी कारवाई करण्यात आली आहे. रहाटणी येथील गणराज कॉलनी परिसरात मतदारांना वाटण्यासाठी आणलेल्या १९ वॉशिंग मशीन भरारी पथकाने जप्त केल्या आहेत. निवडणूक निर्णय अधिकारी अनिल पवार यांच्या मार्गदर्शनाखाली राहुल निकम यांच्या पथकाने रात्री १०:३० च्या सुमारास सापळा रचून हा ट्रक पकडला. स्थानिकांनी दिलेल्या माहितीवरून ही कारवाई करण्यात आली असून, जप्त केलेल्या मशीन्सची किंमत लाखांच्या घरात आहे.
प्रशासनाचा कडा पहारा
दरम्यान, १५ जानेवारी रोजी होणाऱ्या मतदानासाठी पोलीस आणि निवडणूक आयोगाने कंबर कसली आहे. पुण्यात भाजप, दोन्ही राष्ट्रवादी आणि ठाकरे गट यांच्यात चुरशीची लढत होत असतानाच, अशा प्रलोभनांमुळे राजकीय वातावरण अधिकच तापले आहे.


