Sambhajinagar Crime: औरंगाबाद (छत्रपती संभाजीनगर) जिल्ह्यातील कन्नड तालुक्यात असलेल्या जामडी (फॉरेस्ट) परिसरात मंगळवारी एक खळबळजनक घटना घडली. माजी सरपंचाचे चिरंजीव राजू रामचंद्र पवार (४५) यांची अज्ञात हल्लेखोरांनी धारदार शस्त्राने वार करून निघृण हत्या केली. या घटनेमुळे संपूर्ण तालुक्यात खळबळ उडाली असून गावात तणावपूर्ण शांतता आहे.
नेमकी घटना काय?
मिळालेल्या माहितीनुसार, राजू पवार हे मंगळवारी सकाळी ८ वाजेच्या सुमारास नेहमीप्रमाणे आपल्या शेताची पाहणी करण्यासाठी घराबाहेर पडले होते. मात्र, दुपारी उशिरापर्यंत ते घरी न परतल्याने कुटुंबीयांची धाकधूक वाढली. त्यांच्या मोबाईलवर वारंवार संपर्क करूनही प्रतिसाद मिळत नसल्याने ग्रामस्थांच्या मदतीने शोध सुरू झाला. अखेर दुपारी १२:३० च्या सुमारास वनविभागाच्या गट क्रमांक ९५ मधील जमिनीत त्यांचा मृतदेह आढळून आला. हल्लेखोरांनी राजू पवार यांच्यावर अत्यंत निर्घृणपणे हल्ला चढवला होता. त्यांच्या डोक्यावर आणि गुप्तांगावर धारदार शस्त्राने वार करण्यात आल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे. रक्ताच्या थारोळ्यात पडलेला मृतदेह पाहताच कुटुंबीयांनी एकच आक्रोश केला.
तपासासाठी यंत्रणा सज्ज
घटनेची माहिती मिळताच उपविभागीय पोलीस अधिकारी अपराजिता अग्निहोत्री आणि सहायक पोलीस निरीक्षक डॉ. रामचंद्र पवार यांनी ताफ्यासह घटनास्थळी धाव घेतली. प्रकरणाचे गांभीर्य ओळखून छत्रपती संभाजीनगर येथून श्वानपथक, ठसेतज्ज्ञ आणि फॉरेन्सिक व्हॅनला पाचारण करण्यात आले. स्थानिक गुन्हे शाखेचे पथकही आरोपींचा शोध घेत आहे, मात्र अद्याप कोणतीही ठोस माहिती पोलिसांच्या हाती लागलेली नाही.
राजकीय वैमनस्याचा संशय?
पवार कुटुंब स्थानिक राजकारणात मोठे प्रस्थ आहे. राजू यांचे वडील रामचंद्र पवार हे माजी सरपंच आहेत, तर सध्या त्यांच्या काकू रेणुका पवार गावच्या सरपंच आहेत. सरपंच असलेल्या काकूंच्या प्रशासकीय कामाची जबाबदारी राजू हेच सांभाळत असत. त्यामुळे ही हत्या राजकीय वादातून झाली की यामागे काही वैयक्तिक कारण आहे, या दिशेने पोलीस तपास करत आहेत. राजू पवार यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, मुलगी आणि वृद्ध आई-वडील असा परिवार आहे. खबरदारीचा उपाय म्हणून जामडी गावात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला असून, बुधवारी मृतदेहाचे शवविच्छेदन केले जाणार आहे.


