बँकॉक : थायलंडमध्ये एक भीषण रेल्वे अपघात झाला असून धावत्या प्रवासी ट्रेनवर थेट क्रेन कोसळल्याने ट्रेन रुळावरून घसरली आणि काही डब्यांना आग लागली. या दुर्घटनेत २२ प्रवाशांचा मृत्यू झाला असून ७९ हून अधिक जण जखमी झाले आहेत. जखमींपैकी ८ जणांची प्रकृती गंभीर असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
पोलिस अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, बुधवारी सकाळी सुमारे ९ वाजता (स्थानिक वेळेनुसार) बँकॉकच्या ईशान्येला सुमारे २३० किलोमीटर अंतरावर असलेल्या नाखोन रत्चासिमा प्रांतातील सिखिओ जिल्ह्यात हा अपघात घडला. बँकॉकहून देशाच्या ईशान्य भागाकडे जाणारी ही ट्रेन अपघातग्रस्त झाली.
अपघातस्थळी एलिव्हेटेड हाय-स्पीड रेल्वे लाईनचे बांधकाम सुरू होते. याच कामासाठी वापरण्यात आलेली एक मोठी क्रेन ट्रेन येत असतानाच अचानक कोसळून थेट डब्यांवर पडली. क्रेन कोसळताच ट्रेन रुळावरून घसरली आणि त्यानंतर काही डब्यांना आग लागली. आगीवर नियंत्रण मिळवण्यात आले असून बचावकार्य युद्धपातळीवर सुरू आहे.
अपघाताची माहिती मिळताच रेल्वे कर्मचारी, स्थानिक पोलिस आणि बचाव पथक घटनास्थळी दाखल झाले. अडकलेल्या प्रवाशांना बाहेर काढण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू असून जखमींना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
थायलंड रेल्वे प्रशासनाच्या माहितीनुसार, ट्रेनमध्ये सुमारे १९५ प्रवासी प्रवास करत होते. ही संख्या आसन व्यवस्थेवर आधारित असून प्रत्यक्ष प्रवासी संख्या वेगळी असण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. दरम्यान, थायलंडचे उपपंतप्रधान आणि वाहतूक मंत्री पिपट रत्चाकिप्रकर्ण यांनी अपघाताच्या कारणांची सखोल चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत.


